‘सार्वजनिक बांधकाम’ची नाचक्की!
By Admin | Updated: November 11, 2015 02:16 IST2015-11-11T02:16:58+5:302015-11-11T02:16:58+5:30
चीनचे उपराष्ट्रपती ली. इयानचो यांच्या अजिंठा लेण्यांना दिलेल्या भेटीच्या दौऱ्यात खड्डेमय औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे.

‘सार्वजनिक बांधकाम’ची नाचक्की!
विकास राऊत , औरंगाबाद
चीनचे उपराष्ट्रपती ली. इयानचो यांच्या अजिंठा लेण्यांना दिलेल्या भेटीच्या दौऱ्यात खड्डेमय औरंगाबाद- अजिंठा रस्त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाचक्की झाली आहे. परराष्ट्र खात्याने खराब रस्त्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या पथकाने मंगळवारी तातडीने औरंगाबाद ते फर्दापूर रस्त्याची पाहणी केली.
दौऱ्यात गैरहजर राहिलेल्या व फोनवरुनही संपर्क होऊ न शकलेल्या अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांना सक्तीची रजा देत १० नोव्हेंबरपर्यंत त्यांचा रजेचा अर्ज न आल्यास निलंबित करण्याचे आदेश दिले. चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद दौऱ्यात ४ नोव्हेंबरला अजिंठा लेण्यांना भेट दिली होती. ली. इयानचो हेलिकॉप्टरने अजिंठ्याला जाणार होते. त्यामुळे बांधकाम विभागाची यंत्रणा निर्धास्त होती; परंतु परराष्ट्र खात्याकडून हेलिकॉप्टरने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने इयानचो कारने लेणी पाहण्यासाठी गेले. चाळण झालेल्या रस्त्यावरून त्यांचा ताफा गेल्यामुळे बांधकाम विभागाची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली.
परराष्ट्र खात्याने खराब रस्त्याची गंभीर दखल घेत, राज्य सरकारकडे तक्रार केल्याने या दुर्लक्षित रस्त्याच्या पाहणीचा दौरा अचानक निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या दौऱ्याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णी म्हणाले की, मी मराठवाड्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करीत असून, जानेवारी २०१६ पर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन स्थळाचा रस्ता एवढा खराब असताना त्याचा दरमहा आढावा घेतला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. डिसेंबरमध्ये तातडीने या रस्त्याची सरफेसिंग करण्यासाठी त्यांनी ३० कोटी रुपये मंजूर केले.
कनिष्ठ, उपअभियंता, कार्यकारी अभियंते काय करतात, असा सवालही कुलकर्णी त्यांनी केला. कंत्राटदारांना केवळ ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी मुख्य अभियंता
प्रवीण किडे यांना दिले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.जी. बोडखे, मुख्य अभियंता हेमंत पगारे, उपअभियंता अशोक ससाणे, मधुसूदन कांडलीकर त्यांच्यासोबत होते.