राज्यातील धरणे भरू लागली

By Admin | Updated: August 1, 2016 04:35 IST2016-08-01T04:35:05+5:302016-08-01T04:35:05+5:30

जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली

The dams in the state started to fill | राज्यातील धरणे भरू लागली

राज्यातील धरणे भरू लागली


मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आल्याने पिकांचीही चांगली वाढ होणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही धरणसाठ्यात वाढ होत असून लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रकल्पांत दोन दिवसांत जलसाठा वाढला आहे. मराठवाड्यात मात्र अजून धरण साठ्यात मोठी वाढ झालेली नाही.
ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल.
नागपूर विभागातील मोठे प्रकल्प ५७ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. तसेच मध्यम प्रकल्पात ६२ टक्क्यांपर्यंत तर लघु प्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा झाला आहे. अप्परवर्धा जलाशयाच्या पातळीत वाढ झाल्याने रविवारी सायंकाळी तीन दरवाजे उघडून ५० घनमीटर प्रती सेकंदनुसार पाणी सोडण्यात आले.
उजनीत वाढ
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे़ ते आता उणे २८ टक्क्यांवर आले आहे़ दौंडमधून ८६५ क्युसेक्सआणि बंडगार्डनमधून २,९१६ क्युसेक्स विसर्ग धरणात येत आहे़
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ९१ टक्के भरले असले तरी २५.३९२ टीएमसीचे काळम्मावाडी (दूधगंगा) धरण अद्याप ५४ टक्केच भरले आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ५८.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>जायकवाडी मृतसाठ्यातच
जायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. पाणीपातळी जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. गेल्या महिनाभरात जायकवाडी धरणात २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.

Web Title: The dams in the state started to fill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.