‘दामिनी’ देणार संपूर्ण सुरक्षा
By Admin | Updated: October 13, 2015 03:01 IST2015-10-13T03:01:03+5:302015-10-13T03:01:03+5:30
महिला घराबाहेर पडल्यानंतर तिला सुरक्षेचा प्रश्न सतावत असतो. येथील एकलव्य विद्यालयातील चिन्मयी धर्मेंद्र मराठे या दहावीच्या विद्यार्थिनीने त्यावर उपाय शोधला असून

‘दामिनी’ देणार संपूर्ण सुरक्षा
रवींद्र मोराणकर, नंदुरबार
महिला घराबाहेर पडल्यानंतर तिला सुरक्षेचा प्रश्न सतावत असतो. येथील एकलव्य विद्यालयातील चिन्मयी धर्मेंद्र मराठे या दहावीच्या विद्यार्थिनीने त्यावर उपाय शोधला असून, ‘दामिनी:संपूर्ण सुरक्षा’ हे महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे उपकरण तयार केले आहे. इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनासाठी राष्ट्रीय स्तरावर त्याची निवड झाली आहे. शहरातील १०० स्त्रिया व युवतींना चिन्मयीने काही प्रश्न विचारले. त्यावरील उत्तरांवरून तिला महिलांच्या समस्या लक्षात आल्या. कोणाला घर, तर कोणाला एटीएममधून बाहेर पडल्यानंतर पर्स, सोनसाखळी सांभाळणे असुरक्षित वाटत होते. काहींना अत्याचाराची भीती कायम वाटत होती.
छुपा कॅमेरा शोधणारे उपकरण
अलीकडे काही कपड्यांच्या दुकानांमधील चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे असल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने पर्समध्ये बसेल असे छुपा कॅमेरा शोधणारे उपकरण तयार केले आहे. अॅन्टीरेप बेल्ट, अॅन्टीरेप शूजचीही तिने निर्मिती केली आहे. डाव्या बुटात एक ट्रान्समीटर बसविलेला असून, त्याचे सिग्नल
दोन किलोमीटर अंतरापर्यंत जाऊ शकतात. ज्याद्वारे पीडित तरुणी आई-वडील किंवा पोलीस यांना निरोप देऊ शकते. यात जीपीआरएस सीस्टिम कार्यान्वित करण्याची यंत्रणासुद्धा आहे. विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे यांनी चिन्मयीला मार्गदर्शन केले आहे.
आपण घराला साधा कडी-कोंडा व कुलूप लावतो, पण ते चोराला सहज उघडता येते. चिन्मयीने एकाच चावीने उघडणारे इन्फ्रा रेड लाईटवर चालणारे कुलूप बनविले. चावीत ट्रान्समीटर असून, दारामागे रीसिव्हर बसविलेला आहे. चावीतून इन्फ्रा रेड एलईडीद्वारा कोडिंग (पासवर्ड) केलेला सिग्नल गेल्याशिवाय दार बंद होत नाही, तसेच दुसरा कोडिंग सिग्नल गेल्याशिवाय दार उघडत नाही.
पर्सची काळजी : पर्समध्ये रोख रकमेसोबतच बऱ्याच वेळा एटीएम कार्ड, दागिने अशा मौल्यवान वस्तू असतात. चिन्मयीने पर्स सिक्युरिटी उपकरण तयार केले आहे. चोरांनी पर्स पळविली, तर बझरचा मॅग्नेटशी संपर्क तुटतो व मॅग्नेटिक सेंसर बझर (कर्कश आवाज) सुरू करतो, ज्यामुळे चोर ओळखला जातो.
दागिन्यांची सुरक्षा : दागिन्यांच्या सुरक्षिततेचे उपकरणही चिन्मयीने तयार केले आहे. त्यात ६०० व्होल्टचा सप्लाय तयार करणारे, परंतु फक्त एका सेलवर चालणारे सर्किट तयार केले आहे. चोर सोनसाखळी गळ्यातून ओढेल, तेव्हा सोनसाखळीसोबतच हे छोटे सर्किटही बाहेर येते व पाच-सहा मीटर अंतरावर गेल्यावर सर्किट सुरू होते व चोराला ६०० व्होल्टचा झटका बसतो.