‘दमानियांचा अर्ज प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी’
By Admin | Updated: January 1, 2017 01:50 IST2017-01-01T01:50:05+5:302017-01-01T01:50:05+5:30
खासगी रुग्णालयातील मुक्कामाबाबत वाद निर्माण करून, माझ्या तब्येतीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी व माझी प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

‘दमानियांचा अर्ज प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी’
मुंबई : खासगी रुग्णालयातील मुक्कामाबाबत वाद निर्माण करून, माझ्या तब्येतीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी व माझी प्रतिष्ठा धुळीस मिळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अर्ज केल्याचा आरोप माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील आरोपी छगन भुजबळ यांनी दमानिया यांच्या अर्जावरील उत्तरात केला.
जे. जे. रुग्णालय प्रशासन आणि आर्थर रोड कारागृहाच्या दुर्लक्षामुळे भुजबळ न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर करत, तब्बल ४१ दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि करागृह प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी दमानिया यांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला.
या अर्जावर उत्तर देत, भुजबळ यांनी दमानिया यांच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘दमानिया कोणत्या अधिकारांतर्गत मध्यस्थी करत आहेत? असा अर्ज करून माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत, असे भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले. (प्रतिनिधी)