दलित पँथर पुन्हा सक्रिय होतोय !
By Admin | Updated: November 22, 2014 03:20 IST2014-11-22T03:20:33+5:302014-11-22T03:20:33+5:30
नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे.

दलित पँथर पुन्हा सक्रिय होतोय !
मुंबई : नामदेव ढसाळ यांच्या निधनानंतर दलित पँथरही नष्ट होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या चर्चेला पूर्णविराम देत दलित पँथर संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. राज्यातील वाढत्या दलित हत्याकांडाच्या घटनांबाबत येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची घोषणा पँथरने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पँथरची सूत्रे हाती घेतली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिका यांनी केंद्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नामदेव ढसाळ यांचे सहकारी प्रकाश रामटेके यांच्यावर सोपविली. या वेळी रामटेके म्हणाले, की राज्यात दलितांची परिस्थिती फारच भयावह झाली आहे. जुन्या सरकारच्या कारकिर्दीत अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या.
आता सत्ताबदल झाल्याने नव्या सरकारला त्या घटनांबाबत दोषी ठरवता येणार नाही. तरीही पँथर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हल्ले रोखण्यासंदर्भात पावले उचलणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पँथरचे शिष्टमंडळ पीडित कुटुंबीयांना भेट देईल. त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा एकदा राज्य बंद पाडून दाखवू. (प्रतिनिधी)