क्षयरुग्णांना दैनंदिन औषधे
By Admin | Updated: January 26, 2017 04:55 IST2017-01-26T04:55:44+5:302017-01-26T04:55:44+5:30
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून

क्षयरुग्णांना दैनंदिन औषधे
मुंबई : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून, सुरुवातीच्या टप्प्यातील पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशातील ५० जिल्ह्यांत ३० जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
या दोन्ही उपक्रमांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाने अधिसूचित आजार (नोटिफाएबल डिसीज) म्हणून निर्देशित केलेल्या क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याची सूचना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तत्काळ देणे सर्व वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय संस्था आणि संबंधितांना बंधनकारक आहे. मात्र, त्यात टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. तसा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असेल.
कुपोषण उपचार केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाची तपासणी करताना त्यामध्ये क्षयरोगाची चाचणीही आता आवश्यक करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीन एक्सपर्ट हे संयंत्र उपलब्ध करून देण्यात येत असून, या संयंत्रामुळे क्षयरोगाचे निदान अचूक आणि जलदगतीने होणार आहे. परिणामी, क्षयरोगाचे निदान होताच तातडीने उपचार सुरू करण्यात येणार असून, उपचारांमधला विलंब आता टळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)