डहाण-बोर्डी मार्ग बनला धोकादायक
By Admin | Updated: July 4, 2016 03:52 IST2016-07-04T03:52:03+5:302016-07-04T03:52:03+5:30
डहाणू तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे.

डहाण-बोर्डी मार्ग बनला धोकादायक
डहाणू/बार्डी : डहाणू तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून बराचसा भाग पाण्याने व्यापला आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. दरम्यान डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावरील नरपड गावातील कुंभारखाडीनजीकचा रस्ता शनिवारी संध्याकाळी खचल्याने यामार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. डहाणू सार्वजनिक बांधकाम विगभागाच्या दुर्लक्षतेमुळे मार्ग धोकादायक बनल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
आजतागायत डहाणू तालुक्यात या मोसमतील पावसाने हजार मिमी टप्पा गाठला आहे. काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाचे पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. नरपड गावतील साई बाबा मंदिराजवळील कुंभारखाडी येथे दोन दिवसांपासून रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. शिवाय काल संध्याकाळी या फरशीच्या डहाणूकडील भागाचा डांबरी रस्ता खचल्याची घटना घडली. दरम्यान स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून, धोक्याची सूचना देणारा झेंडा आणि अवजड वस्तु रस्त्याच्या मध्यभागी ठेवल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.
चिखले गावातील वडकतीपाड्याच्या बर्वेवाडी येथील वळणावर मोरीला मोठाले भगदाड पडले आहे. त्यामुळे डहाणू बोर्डी हा प्रमुख मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने जीव गमवण्याची वेळ येवून ठेपल्याने स्थानीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बाबत डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ पाऊल उचलण्याची मागणी जोरधरू लागली आहे. (वार्ताहर)