डहाणू-बोर्डी मार्ग विसर्जनास धोक्याचा
By Admin | Updated: September 10, 2016 02:50 IST2016-09-10T02:50:18+5:302016-09-10T02:50:18+5:30
डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्ग खड्डेमय झाल्याने डांबरी रस्त्यावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला.

डहाणू-बोर्डी मार्ग विसर्जनास धोक्याचा
डहाणू/बोर्डी : डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्ग खड्डेमय झाल्याने डांबरी रस्त्यावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला. मात्र, अवजड वाहतूक आणि पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर चिखल पसरला आहे. त्यामुळे पाच दिवसांचे व दहा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक निघाल्यावर या निसरड्या रस्त्याचे विघ्न असून अपघात टाळणे गणेशभक्तांसाठी आव्हान बनले आहे. दरम्यान, मूर्तीला धोका पोहोचल्यास या प्रकाराने धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
येत्या शनिवारी व गुरुवारी पाच व दहा दिवसांच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक आहे. त्यामुळे डहाणू फोर्ट येथील मूर्तींची या मार्गावर रीघ लागेल. डहाणू-बोर्डी या प्रमुख राज्य मार्गाची चाळण झाली आहे. अनेक वर्षांपासून निधी मंजूर न झाल्याने रस्त्याचे विकासकाम हाती घेतलेले नाही. त्यामुळे रस्ता खड्डेमय बनला आहे.
उत्सवाच्या अनुषंगाने लोकांचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांना दगड, मातीचा भराव घालून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, मार्गावरील अव्याहत अवजड वाहतुकीमुळे भराव निघून गेला. शिवाय, पावसामुळे मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरून रस्ता निसरडा बनला आहे. (वार्ताहर)
>पोलीस कारवाई करीत नाहीत
वाहतूककोंडी आणि धोकादायक मार्गामुळे अपघाताची शक्यता बळावळी आहे. घोलवड आणि डहाणू पोलीस अवजड व अवैध वाहतुकीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दरम्यान, निसरड्या रस्त्यांवरून वाहनांना अपघात होत असल्याने विसर्जनादरम्यान गणेशमूर्तीं घेऊन जाताना खड्ड्यांचे विघ्न येण्याची भीती गणेशभक्तांना सतावत आहे. गणेशमूर्तींची वाहतूक करणे भक्तांकरिता आव्हान ठरले आहे. दुर्दैवाने अपघात घडून मूर्तीला अपाय झाल्यास धार्मिक भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.