मुलाच्या लग्नासाठी 'डॅडी' गवळी हजर राहणार
By Admin | Updated: April 30, 2015 15:09 IST2015-04-30T15:09:16+5:302015-04-30T15:09:30+5:30
कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून १५ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

मुलाच्या लग्नासाठी 'डॅडी' गवळी हजर राहणार
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३० - कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याचा मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
अरुण गवळीचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न आहे. गवळीची सून नागपुरातील असून, ती पदवीचे शिक्षण घेत आहे. गवळीला काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता मात्र त्यांनी २३ एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज काही अटींसह गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला. गवळी याला भायखळ्यातील आग्रीपाडा पोलिस स्थानकात दरदिवसाआड हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पॅरोलवर असताना तो कुठे कुठे जाणार आहे, याचा तपशीलही त्याला पोलिसांना सादर करावा लागणार आहे.
अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांदेकर यांच्या खूनप्रकरणात २०१२ साली मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. तेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले. गवळीविरुद्ध मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.