दारुड्याचा पत्नी, मुलावर अॅसिड हल्ला
By Admin | Updated: August 24, 2015 00:47 IST2015-08-24T00:47:52+5:302015-08-24T00:47:52+5:30
दारुड्याने किरकोळ वादातून पत्नी व मुलाच्या अंगावर अॅसिड फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील गोविंदनगर भागात

दारुड्याचा पत्नी, मुलावर अॅसिड हल्ला
नांदेड : दारुड्याने किरकोळ वादातून पत्नी व मुलाच्या अंगावर अॅसिड फेकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील गोविंदनगर भागात घडली़ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून महिला आणि मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गोविंदनगर भागात मधुकर शहाणे (४०) हा पत्नी ज्योती (३२) आणि मुलगा अनिकेत (१०) यांच्यासोबत राहतो़ मधुकर सराफा दुकानात कारागीर म्हणून काम करतो़ दारूच्या व्यसनामुळे त्याने अनेकांकडून कर्जही घेतले होते़ वेळेवर कर्ज फेडू न शकल्याने अनेकांनी घरी येऊन त्याची पत्नी ज्योती यांना ही बाब सांगितली़ याबाबत ज्योती यांनी विचारणा केली असता मधुकर वारंवार मारहाण करू लागला़
दरम्यान, शनिवारी रात्री मधुकर पुन्हा दारुच्या नशेत तर्र होऊन घरी आला आणि काही कळण्याच्या आत त्याने सोबत आणलेल्या देशी दारुच्या बाटलीतील अॅसिड पत्नी आणि मुलाच्या अंगावर फेकले़ त्यानंतर दरवाजाची कडी बाहेरुन लावून पळ काढला़ ज्योती व अनिकेतने आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़