दादा-बापूंचा संघर्ष कार्यकर्त्यांच्या खुमखुमीतून
By Admin | Updated: October 15, 2015 00:56 IST2015-10-15T00:20:35+5:302015-10-15T00:56:17+5:30
दिलीपतात्या पाटील : वारसदारांनी सहकारवाढीकडे लक्ष द्यावे

दादा-बापूंचा संघर्ष कार्यकर्त्यांच्या खुमखुमीतून
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात मतभेद होते, पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. त्यांच्यात कधीच टोकाचा संघर्ष नव्हता, पण कार्यकर्त्यांच्या खुमखुमीतून दादा-बापू संघर्ष जिल्ह्यात आजही सुरू आहे, अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि बापूंचे कट्टर अनुयायी दिलीपतात्या पाटील यांनी केली. संघर्षाच्या नावाखालील टोकाचे, द्वेषाचे राजकारण थांबवून सहकार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहनही त्यांनी दादांच्या वारसदारांना केले.येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून दिलीपतात्या पाटील बोलत होते. वसंतदादा’चे अध्यक्ष विशाल पाटील यांनी त्यांना निमंत्रण दिल्यानंतर जिल्हाभरात चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बापू आणि दादांच्या संघर्षाचे साक्षीदार असलेले दिलीपतात्या म्हणाले की, दादा आणि बापूंचा वाद खुजगाव येथील धरणावरून निर्माण झाला होता. तो मिटविण्याचा प्रयत्न आम्ही अनेकवेळा केला. ज्या-ज्यावेळी दादा-बापू एकत्र आले, त्यावेळी त्यांनी एकमेकांचा आदर केला. दोन्ही नेत्यांत वैचारिक मतभेद होते, पण त्यांनी कधीच टोकाचा संघर्ष केला नव्हता. एकमेकांच्या संस्था मोडीत निघाव्यात, असे प्रयत्न कधीच केले नाहीत. आज ज्या पाणीपुरवठा संस्था कार्यरत आहेत, त्यांना वसंतदादांनीच मंजुरी दिली आहे. त्यामुळेच आज राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात भरपूर ऊस दिसत आहे. बापूंनीही वसंतदादांच्या संस्था अडचणीत येतील, असे काही केले नव्हते. दोघांनी सूडाचे राजकारण कधीच केले नव्हते. उलट सहकार वाढविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केले. राजकीय मतभेद असले तरी, व्यक्तिगत जीवनामध्ये ते एकमेकांची काळजीपूर्वक विचारपूस करीत. दोघांमध्ये नेहमीच चांगला संवाद होता. बापूंच्या निधनानंतर दादांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन धीर दिला होता. ‘सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, मी तुझ्याबरोबर आहे. काही अडचण निर्माण झाल्यास मला सांग’, असे सांगितले होते. मात्र, या दोन नेत्यांतील नसलेला वाद आणि संघर्ष केवळ कार्यकर्त्यांनीच पेटविला. हे दोन नेते एकत्र असले, तर आपल्याला कोण विचारणार, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दादा-बापू संघर्ष आजअखेर पेटवत ठेवला आहे. दोन्ही घराण्यातील हा संघर्ष सहकाराला परवडणारा नाही. कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला संघर्ष बाजूला ठेवून दोन्ही घराण्यांनी सहकार वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. (प्रतिनिधी)
दिलीपतात्यांचा हातगुण ‘लय भारी’
तात्यांचा हातगुण चांगला असल्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित केल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. हाच धागा पकडून तात्या म्हणाले की, माझ्या हातून ज्या संस्थांचे भूमिपूजन झाले, त्या सध्या ‘लय भारी’ सुरू आहेत. आता तुमच्यावर संकट आल्यामुळे हा कृष्ण तुमच्या मदतीला धावून आला आहे. तुमच्याही संस्था चांगल्या चालतील!
पाहुणा नव्हे, बँकेचा अध्यक्ष म्हणून आलो!
वसंतदादा कारखान्याच्या गळीत हंगामास मी येणार की नाही यावरून उलट-सुलट चर्चा झाली. कोणी म्हणाले की, जयंत पाटील या कार्यक्रमास जाऊ देणार नाहीत. मात्र ही फक्त चर्चाच होती. मी कार्यक्रमास येणार, असे विशाल पाटील यांना सांगितले होते.
या कार्यक्रमास पाहुणा म्हणून नव्हे, तर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून आलो आहे. बँकेचा कारभार सांभाळताना नियमबाह्य कामाबद्दल कोणाचाही फोन येत नाही. नियमात असेल ती मदत वसंतदादा कारखान्यास करणार आहे, असे मत दिलीपतात्यांनी व्यक्त केले.
दादांनीही आमची फसवणूक केली!
दादांनी जयंत पाटील आणि माझ्याशी मुंबईत चर्चा केली. जनता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची सूचना केली. जयंत पाटील यांना आमदार करायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार आम्ही सांगलीत येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. लगेच रेडिओवर जनता पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण केल्याचे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी पाहतो तर वाळवा मतदारसंघातून विलासराव शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. दादांना आम्ही याबाबत विचारले, तर त्यांनी, ‘पोरा तुझे वय बसत नाही,’ असे सांगून आमची समजूत काढली. आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे जाणवत होते. विशेष म्हणजे दादांनी शिंदेंनाही पाडले आणि नागनाथअण्णा नायकवडींना निवडून आणले.