दाभोलकरांच्या हत्येला उलटली २ वर्ष, अंनिसचे राज्यभर आंदोलन
By Admin | Updated: August 20, 2015 12:10 IST2015-08-20T10:22:01+5:302015-08-20T12:10:57+5:30
अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष उलटून गेल्यावरही मारेक-यांचा शोध न लागल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात आंदोलन होत आहे.

दाभोलकरांच्या हत्येला उलटली २ वर्ष, अंनिसचे राज्यभर आंदोलन
>ऑलाइन लोकमत
पुणे, दि. २० - अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन वर्ष उलटून गेली असली तरी अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागलेला नसल्याच्या निषेधार्थ अंनिसतर्फे आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दोन वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या त्याच पुलावर आज सकाळी अंनिसच्या कार्यकर्त्यांतर्फे मोर्चा काढण्यात आला. दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप फक्त मारेक-यांची रेखाचित्रेच जारी झाली असून मारेक-यांना कधी पकडण्यात येणार असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारला विचारला. राज्.भरात विविध कार्यक्रमांचे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पाठीमागून येऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, त्यांचे होत असलेले शोषण थांबविण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात आला. दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावून त्यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी याकरिता पुरोगामी संस्था, संघटनांकडून गेल्या दोन वर्षांपासून आवाज उठविला जात आहे. त्यांच्या खुन्यांना पोलिसांनी अटक करावी, तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच दाभोलकरांचे विवेकवादी विचार देशभर पोहोचविण्याचा चंग अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बांधला. त्यातून राज्यभर प्रबोधनचा विचार पोहोचविण्यात अंनिसला मोठे यश मिळाले आहे.