दाभोळकरांच्या भूताने परिनिरीक्षण मंडळाला झपाटले
By Admin | Updated: July 31, 2014 01:01 IST2014-07-31T01:01:54+5:302014-07-31T01:01:54+5:30
दाभोळकरांचे भूत या श्याम पेठकर लिखित नाटकाने चांगलाच गदारोळ केला. हा गदारोळ आणि चर्चा वैचारिक, सामाजिक बाजूने झाला. एका विशिष्ट सदस्याचा या नाटकावर आक्षेप असल्याने बहुमत

दाभोळकरांच्या भूताने परिनिरीक्षण मंडळाला झपाटले
नागपूर : दाभोळकरांचे भूत या श्याम पेठकर लिखित नाटकाने चांगलाच गदारोळ केला. हा गदारोळ आणि चर्चा वैचारिक, सामाजिक बाजूने झाला. एका विशिष्ट सदस्याचा या नाटकावर आक्षेप असल्याने बहुमत असल्यावरही नाटकाला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने परवानगी दिलेली नव्हती. या विषयावर बरेच चर्वितचर्वण झाले. दाभोळकरांचे भूत या नाटकावरच मंडळाची नागपुरातील बैठक गाजली. पण शितल करदेकर या सदस्य मात्र परवानगी न देण्याच्या मुद्यावर ठाम राहिल्या.
आता बहुमताच्या आधारावर या नाटकाला परवानगी देण्याचे अध्यक्ष राम जाधव यांनी मान्य केले आहे. पण मंडळाच्या सदस्यांमध्ये वैचारिक गोंधळ आहे आणि कुणीच निश्चित वैचारिक अधिष्ठानावर नसल्याने आपल्याला काहीही शिकायला मिळत नाही, असे कारण देत मुंबईच्या मंडळ सदस्य नम्रता भिंगार्डे यांनी मंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मंडळावर आपली नियुक्ती करण्यात आली तेव्हा नाट्यक्षेत्रातले दिग्गज लोक या समितीत असतील आणि त्यांच्याकडून काही नवे शिकायला मिळेल, अशी आशा होती. पण मंडळाच्या काही बैठकांना उपस्थित राहिल्यावर मात्र मंडळाच्या बैठका वैचारिक उंचीवर जात नसल्याचे लक्षात आले. त्यामुळेच आपण राजीनामा दिल्याचे मत नम्रता भिंगार्डे यांनी राजीनाम्यात व्यक्त केले आहे.
प्रत्यक्षात दाभोळकरांचे भूत या नाटकावरून मंडळ सदस्यांमध्ये होणारी चर्चा योग्य नव्हती. एखाद्या नाटकाबाबत निर्णय घेताना मंडळ सदस्य ठामपणे निर्णय घेत नाहीत. त्यातील चर्चांमध्ये अभ्यासपूर्णता नसते, त्यामुळे भिंगार्डे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
यंदा मंडळावर ज्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली तीच मुळात योग्य नसल्याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे.
शासनाने कुठल्या आधारावर मंडळ सदस्यांची नेमणुक केली, हा प्रश्नही चर्चेला येतो आहे. याच अनुषंगाने सर्वत्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.(प्रतिनिधी)