अधिका-याला दाभोलकर हत्येचा तपास थांबवण्याची धमकी
By Admin | Updated: December 18, 2015 09:35 IST2015-12-18T09:23:54+5:302015-12-18T09:35:29+5:30
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी मिळाली आहे.

अधिका-याला दाभोलकर हत्येचा तपास थांबवण्याची धमकी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १८ - डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास थांबवण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी मिळाली आहे. घोडके दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआयच्या पथकात आहेत. घोडके यांनी या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास थांबवा अन्यथा प्राणांना मुकाल असा घोडके यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज आला होता. या मॅसेजमध्ये त्यांच्याकडे २५ लाख रुपयाची खंडणीही मागितली आहे. घोडके यांना दोन डिसेंबरला धमकीचा पहिला मॅसेज आला होता पण त्यावेळी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र पुन्हा नऊ डिसेंबरला तसाच मॅसेज आल्याने त्यांनी खडकी पोलिस स्थानकात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या झाली होती. या हत्येला दोन वर्ष उलटली तरी अजूनही मुख्य आरोपी सापडलेले नाहीत.