दाभोलकर, पानसरेंचे कार्य अभ्यासक्रमात यावे
By Admin | Updated: March 20, 2015 01:05 IST2015-03-20T01:05:25+5:302015-03-20T01:05:25+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.
दाभोलकर, पानसरेंचे कार्य अभ्यासक्रमात यावे
पुणे : युवा संस्था व संमेलनांनी सामाजिक ध्येय गाठताना सामाजिक हिंसा, कृत्य करू नये; व्यक्तीने व्यक्तीवर विश्वास ठेवून संवाद वाढवावा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव अखिल भारतीय युवा साहित्य संमेलनात समारोप समारंभात करण्यात आले.
टेकरेल आयोजित अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचा समारोप बुधवारी झाला. त्यात या ठरावांसह दुष्काळी भागातील व गारपीट झालेल्या भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांची जबाबदारी कल्याणकारी शासनाने स्वीकारावी, युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय संमेलने घ्यावीत व माध्यमांचा योग्य वापर करावा, मराठी भाषेला जलदरीत्या अभिजात दर्जा द्यावा, असे ठराव करण्यात आले.
तरुण रक्ताला भडकावण्याची कामे होतात; पण युवकांनी कोणत्याही संघटनेत सहभागी होण्यापूर्वी हजार वेळा विचार करणे आवश्यक आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
मोरे म्हणाले, ‘‘प्रत्येक धर्माकडे विवेकाने पाहिले पाहिजे, बुद्धीने नाही. धर्माचे विकृतीकरण थांबविण्याचे कार्य दाभोलकर करत असत.’’
उल्हास पवार म्हणाले, ‘‘सध्या शब्दांचे रणकंदन सुरू आहे. याकरिता प्रत्येक गोष्टीचे विचार व त्यामागचा भावार्थ समजून घेणे आवश्यक आहे. लोकशाहीतून सारासार विचार संपत चालला आहे.
तरुणांसाठी संमेलन हे चांगले व्यासपीठ आहे. यातून त्यांची वैचारिक पातळी वाढते व पायादेखील येथेच घातला जातो, अशी भावना उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी व्यक्त केली. सुभाष वारे म्हणाले, ‘‘आजची तरुणाई ही तक्रार करणारी नसून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारी आहे. यासाठी त्यांना पाठिंबा व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.’’ सचिन परब, महेश थोरवे, भूषण कदम आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
संस्कृती, परंपरा जपली पाहिजे
१ संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपली संस्कृती काय सांगते, याचा विचार करणे गरजेचे आहे. माणूस संस्कृतीला ओझे समजतोय आणि तसेच वागतोय, असे मत अर्थ साहित्य संस्कृती अभ्यासक अभय टिळक यांनी बुधवारी व्यक्त केले.
२ युवा साहित्य संमेलनात ‘चौकटीबाहेरील चर्चा’ कार्यक्रमात ‘संस्कृती आणि मुक्त चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. संमेलनाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांनी मते नोंदविली.
३ शरद तांदळे यांनी ‘मी उद्योजक का आहे?’ यावर मत मांडले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक उद्योजकाने हा विचार करायला हवा, की मी उद्योजक का झालो? तर, जगण्यासाठी झालो. एखादा उद्योग करताना आपल्याला अर्थकारण माहीत पाहिजे. जर नसेल तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे.’’
४ राजकुमार तांगडे यांनी ‘मी नाटक का करतो?’ या विषयावर मत नोंदविले. ते म्हणाले, ‘‘समाजात ज्या अन्यायकारक घटना घडतात, अशा घटनांवर नाटकाद्वारे प्रकाश टाकतो. आपल्या आतमध्ये जे आहे, ते लिहिण्याचा आणि व्यक्त करण्याचा प्रयत्न नाटकातून करीत आलोय.’’