दाभोळच्या कळंबटे कुटुंबियांसाठी एक दिवसाची काळरात्र...!
By Admin | Updated: March 26, 2015 00:08 IST2015-03-25T22:19:40+5:302015-03-26T00:08:15+5:30
मुंबईतही माणुसकीचा ओलावा...मुलांची मानसिकता ...गूढ कायम !

दाभोळच्या कळंबटे कुटुंबियांसाठी एक दिवसाची काळरात्र...!
दाभोळ : अवघी १२ वर्षांची तनुजा...वडील मद्यप्राशन करतात म्हणून घर सोडणारी...बाहेरच्या जगात जगण्यासाठी म्हणून आजीच्या बटव्यातील पाच हजार रूपये घेऊन गावचा निरोप घेणारी... हे सारं घडलं दाभोळ गावात. त्यानंतर तनुजाच्या घरचं वातावरणच बिघडलं. दुसऱ्या दिवशी तनुजानं दाभोळ व्हाया मुंबई आणि पुन्हा दाभोळ गाठलं. त्यावेळी चिंतेत असलेल्या तनुजाच्या अख्ख्या घरावर आनंदाचं हास्य फुललं.
तनुजा उदय कळंबटे, वय अवघं १२ वर्षे. ही मुलगी १६ मार्चला दुपारी बेपत्ता झाली. सकाळी ती शाळेत जाते, असे सांगून निघाली. पण दुपार झाली तरी घरात आली नाही. तनुजा गेली कुठे? या चिंतेत दाभोळ बेंडलवाडीतील अख्खं घर बुडालं. गावभर शोधाशोध झाली. पण ती कुठंच सापडली नाही. अखेरीस याबाबत पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला. तनुजाचं अपहरण झालं असावं, या अंदाजाने पोलिसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हाही दाखल केला. पण...सत्य वेगळंच होतं.
इकडे घरातून बेपत्ता झालेल्या तनुजानं ठरवलं होतं की, दारूच्या नशेत जगणाऱ्या, शिविगाळ करणाऱ्या बापाबरोबर राहायचंच नाही. तिनं आजीच्या बटव्यातून पाच हजार रूपये आधीच घेतले होते. तिला तिच्या मोठ्या बहिणीकडे मालाडला जायचं होतं. त्यासाठी ती दापोली भार्इंदर गाडीत चढली. मात्र, मालाडला न उतरता ती बोरिवलीत उतरली. त्यावेळी रात्रीचे ७.३० वाजले होते.
मोठ्या धीराने बाहेर पडलेल्या तनुजाच्या चेहऱ्यावर चिंताच दिसत होती. समोरच असलेल्या एका गाडीवर तिने वडापाव खाल्ला. तनुजानं ठरवलं की, या मुंबईत फिरायला नको. तिने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. ज्या संतापाने ती बाहेर पडली होती, त्या संतापाची जागा आता दयेने घेतली होती. ती बोरिवली दापोली गाडीने पुन्हा दाभोळला परतली.
ती आपल्या घरी परतली आणि चिंतेत बुडालेले कळंबटे कुटुंबियांना एकच आनंद झाला. तिची पोलिसांनी चौकशी केली असता, तिच्याकडे चार हजार चारशे पासष्ठ रुपये आढळून आले. कोणत्याही घटनेचा चिमुकल्या मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो आणि त्यातून काय घडू शकतं, हेच तनुजाच्या बाबतीतील घटनेतून दिसून आलं.
मुंबईतही माणुसकीचा ओलावा...
मुंबईत वडापाव खाण्यासाठी तनुजा एका गाडीवर गेली. त्या गाडीवाल्याला तिची दया आली. त्यानं तिला वडापाव दिलाच, उलट प्रवासखर्चासाठी १०० रुपये दिले. त्याला तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. त्यानेच तिला बोरिवली-दापोली गाडीत बसवून दिलं. जिथं माणुसकी शोधूनही सापडत नाही, त्या मुंबईच्या महानगरीत तनुजाला माणुसकीचा ओलावा सापडला. त्या गाडीवाल्याचं नाव होतं सुनील कदम!
मुलांची मानसिकता
तनुजाच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने लहान मुलांची बदलणारी मानसिकता समोर आली आहे. पालकांच्या स्वभावाचा आणि कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या मानसिकतेवर होणारा दूरगामी परिणाम यामुळे दिसून आला. गेल्यावर्षी तिघा मित्रांनी घरी चोरी करून पाच हजारांची रोकड घेऊन मुंबई गाठल्याची घटना घडली होती.
गूढ कायम !
तनुजा मुंबईमध्ये कोणाबरोबर गेली, तिला तिथपर्यंत कोणी नेले, याचे गूढ अद्याप कायमच आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, कर्मचारी पी. एल. चव्हाण, अशोक गायकवाड, महिला पोलीसपाटील करत आहेत.