‘डी गँग’ अजूनही मुंबईत सक्रिय !
By Admin | Updated: June 3, 2015 03:27 IST2015-06-03T03:27:40+5:302015-06-03T03:27:40+5:30
कुख्यात गुंड दाऊद कोठे आहे हे माहीत नाही, असे केंद्र सरकारने या महिन्याच्या आरंभी जाहीर केले असले तरीही दाऊदचा सहकारी छोटा शकील व मुंबईतील एक बिल्डर

‘डी गँग’ अजूनही मुंबईत सक्रिय !
डिप्पी वांकाणी, मुंबई
कुख्यात गुंड दाऊद कोठे आहे हे माहीत नाही, असे केंद्र सरकारने या महिन्याच्या आरंभी जाहीर केले असले तरीही दाऊदचा सहकारी छोटा शकील व मुंबईतील एक बिल्डर यांच्यातील २०१२ साली पोलिसांनी टिपलेले टेलीफोनवरील संभाषण पाहिले, तर वेगळेच कथानक समोर येते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने टिपलेल्या या संभाषणाचे काही अंश ‘लोकमत’ला मिळाले असून, या संभाषणात छोटा शकील आत्मविश्वासाने असे सांगतो, की मुंबईच्या पोलीस आयुक्तांची महिनाभरात बदली होईल व या बिल्डरची इच्छा असेल तर त्याची भाईशी (दाऊदशी) भेट होईल.
पोलिसांनी हे संभाषण १७ आॅगस्ट २०१२ रोजी सायंकाळी ५.५१ वाजता टिपले आहे. शकील त्या वेळी कराचीहून बोलत होता, तर बिल्डर सौदी अरेबियातून बोलत होता. त्या वेळी पटनाईक मुंबईचे पोलीस आयुक्त होते. २३ आॅगस्टला पटनाईक यांना बढती देण्यात आली. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सरसंचालक हे पद देण्यात आले. हा बिल्डर बांद्रा येथील होता. जमिनी हिसकावून घेण्यासाठी तो कुप्रसिद्ध होता. त्याला काही वेळा अटकही झाली होती. आपल्याला लोक दाऊदचा माणूस म्हणून ओळखतात, असे तो शकीलला सांगत होता. मुंबईत मला कोणाचीही भीती नाही़ भीती असलीच तर ती पोलीस आयुक्तांची आहे, असे त्याने सांगितले़ त्यावर शकीलने त्याला पोलीस आयुक्तांची महिनाभरात बदली होईल, असे सांगितले होते. दोन महिने भूमिगत राहा, असे शकीलने या बिल्डरला सांगितले होते़ त्यानंतर तुझी भाईशी भेट करून देतो, असे आश्वासनही दिले होते. या संभाषणावरून दाऊद व त्याच्या टोळीला मुंबईत अजूनही रस असल्याचे दिसते व येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करेपर्यंत त्याची पोहोच आहे, असेही दिसते.