चेंबूरमध्ये सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: August 26, 2014 04:33 IST2014-08-26T04:33:39+5:302014-08-26T04:33:39+5:30
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर घडली.

चेंबूरमध्ये सिलिंडरचा स्फोट
मुंबई : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर घडली. या घटनेत १५ जण जखमी असून, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महेश जगताप (३८) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून, तो येथील सहदीप कॉलनीतील जगताप चाळीत आई, पत्नी व दोन मुलींसह राहत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यानंतर सर्वजण झोपले होते. मात्र घरातील गॅस सिलिंडर लिकेज असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गॅसगळती होत होती. रात्रीच या कुटुंबीयांना गॅसचा वास येत होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्रभर हा गॅस संपूर्ण घरामध्ये पसरला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश यांची पत्नी जोत्स्ना जगताप (२५) नेहमीप्रमाणे झोपेतून उठली. तिने लाइट लावण्यासाठी बटण चालू केले. याच दरम्यान घरात पसरलेल्या गॅसने पेट घेतला आणि काही क्षणांतच सिलिंडरचा देखील मोठा स्फोट झाला. गॅसचा हा स्फोट एवढा भयानक होता, की त्यामुळे घरावर असलेला पोटमाळा खाली कोसळला. शिवाय आजूबाजूच्या तीन घरांच्या भिंतीदेखील झोपेत असलेल्या कुटुंबीयांवर कोसळल्या. त्यात एकाचा मृत्यू तर १५ जखमी झाले.