प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हत्येचा कट उधळला!
By Admin | Updated: November 18, 2014 03:05 IST2014-11-18T03:05:36+5:302014-11-18T03:05:36+5:30
गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने बॉलीवूडमधील नामवंत दिग्दर्शक व निर्मात्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हत्येचा कट उधळला!
मुंबई : गुन्हे शाखेच्या मोटार वाहन चोरीविरोधी पथकाने बॉलीवूडमधील नामवंत दिग्दर्शक व निर्मात्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. गँगस्टर रवी पुजारीने या संभाव्य हत्याकांडाचे आदेश दिले होते. त्यानुसार दिग्दर्शकाच्या निवासस्थानाची पाहणी करून, त्याच्या दिनक्रमाची इत्थंभूत माहिती काढून हत्याकांडाची आखणी करणाऱ्या पुजारी टोळीच्या १३ जणांना गुन्हे शाखेने अटक केली.
विशेष म्हणजे अटक केलेल्या टोळीतल्या एका गटाने आॅगस्ट महिन्यात बॉलीवूड निर्माते करीम व अली मोरानी यांच्या निवासस्थानी गोळीबार केला होता, असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गोळीबारात सहभागी असलेल्यांना त्याही गुन्ह्यात अटक केली जाणार आहे.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारा, सामाजिक विषयांमध्ये बोलणारा, सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेणारा अशी ओळख असलेल्या या दिग्दर्शकाला नुसते घाबरवू नका तर त्याला किंवा दिग्दर्शक असलेला त्याचा भाऊ किंवा कुटुंबापैकी कोणीही सापडल्यास हत्या करा, असे आदेश पुजारीने आपल्या टोळीला दिले होते. त्यामुळे हत्याकांड घडविण्यासाठी या दिग्दर्शकाच्या निवासस्थान, तेथील सुरक्षा, त्याचा नित्यक्रम जाणून घेण्यासाठी टोळीने दोन ते तीन वेळा रेकी केली होती. त्यानुसार कट आखून १५ नोव्हेंबरला रात्री ८च्या सुमारास टोळीतले ९ जण खार, ११व्या रस्त्यावरील मधुपार्क इमारतीत गोळा झाले होते.
या दिग्दर्शकाच्या हत्येसाठी पुजारी टोळी धडपड करते आहे अशी कुणकुण मोटार वाहन चोरीविरोधी पथकाचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार साईल, गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे धीरज कोळी आणि पथकाने मधुपार्क येथे आधीच सापळा रचला. टोळी तेथे आल्याची खात्री पटताच पथकाने छापा घालून त्यापैकी सात जणांना गजाआड केले. प्राथमिक चौकशीत दिग्दर्शकाची हत्या, हत्येत सहभागी असलेले अन्य साथीदार यांची माहिती काढून पथकाने दोन दिवसांत १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४ पिस्तुले आणि ७.६५ बोअरची २० जिवंत काडतुसे हस्तगत केली. (प्रतिनिधी)