व्हिजिटर रूममध्ये शिजला कट !
By Admin | Updated: April 5, 2015 01:42 IST2015-04-05T01:42:28+5:302015-04-05T01:42:28+5:30
मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या खतरनाक कैद्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच पळून जाण्याचा कट रचला होता. हा कट व्हिजिटर रुममध्ये शिजला.

व्हिजिटर रूममध्ये शिजला कट !
नरेश डोंगरे - नागपूर
मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या खतरनाक कैद्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच पळून जाण्याचा कट रचला होता. हा कट व्हिजिटर रुममध्ये शिजला. कटाच्या अंमलबजावणीसाठी कैद्यांना येथूनच रसद पोहचल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. शनिवारी पुन्हा एक व्हिडिओ क्लिप लोकमतच्या हाती लागली. या क्लिपमधून आणि संबंधित सूत्रांनुसार, या व्हिजिटर रूममधून कैदी पलायन कटाच्या अंमलबजावणीला पुढची दिशा मिळाल्याचे स्पष्ट होते़
मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला (दक्षिणेला) व्हिजिटर रूम आहे. अत्यंत संवेदनशील समजली जाणारी व्हिजिटर रूम खाबुगिरीला चटावलेल्या तुरुंग प्रशासनाने ‘अड्डा’ बनविली होती. त्यामुळे या व्हिजिटर रुममध्ये नेहमीच वर्दळ असायची. कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी शिक्षाप्राप्त कैद्याला महिन्यातून दोन वेळा तर न्यायाधीन कैद्याला महिन्यातून चार वेळा नातेवाईकाला भेटता येते. पूर्वपरवानगी आणि रितसर नोंद केल्यानंतर कारागृह प्रशासन कैदी-नातेवाईकाची भेट घडवून आणते. कैद्याला भेटण्यास पाठवण्यापूर्वी भेटीला येणाऱ्याची कसून तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, भेटीला येणाऱ्याने काय सोबत आणले हे पाहण्यापेक्षा तो किती रक्कम देतो, त्याकडेच सर्व लक्ष देत होते.
व्हिजिटर रूममध्ये कारागृहाच्या नियमानुसार मोबाईल अथवा कोणतीही दुसरी चीजवस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. तसा फलकही व्हिजिटर रूममध्ये लागला आहे. मात्र, तेथे पैशापुढे नतमस्तक झालेले कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी या साऱ्याच नियमांना बासनात गुंडाळून ठेवायचे. ते बहुतांश लोकांची झडतीच घेत नव्हते. (मोबाईलमधून बनविलेल्या क्लिपिंगमधून त्याची खात्री पटावी.) कैदी आणि भेटीला येणाऱ्याच्या मध्ये गज लावलेली खिडकी राहते. या खिडकीला जाळी असते. या जाळीच्या छिद्रातूनच कैद्याला करकरीत नोटा (पुंगळ्या करून) दिल्या जायच्या. खास माहिती लिहिलेले कागदही पुंगळी करूनच कैद्यापर्यंत पोहचवले जायचे. प्रसंगी जाळी वाकवून गांजा, गर्दसारखे अमली पदार्थ कैद्यापर्यंत पोहचवली जात होती.
मिळालेल्या नोटांमधून काही हिस्सा ‘तो कैदी’ आतमधील अधिकारी, कर्मचाऱ्याच्या हातात कोंबायचा. त्याचमुळे व्हिजिटर रूममधून कैद्यापर्यंत बिनदिक्कत ‘रसद’ पोहचवली जायची. कैदी पलायन प्रकरणापूर्वी असाच प्रकार घडल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. गेल्या काही दिवसांपासून पळून गेलेल्या कैद्यांना भेटायला आलटून पालटून येणाऱ्यांची संख्या वाढली होती आणि त्यांचे मोबाईलही अलिकडे खूपच व्यस्त झाले होते. व्हिजिटर रूममधूनच त्यांच्यापर्यंत आवश्यक ती रसद पोहचली. त्यामुळे पळून जाण्याच्या कटाची सहज अंमलबजावणी होऊ शकली, असेही सूत्रे सांगतात.
च्शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत कारागृहात घेतलेल्या झडतीत तपास पथकांना पुन्हा २६ मोबाईल, ३ सीमकार्ड आणि २८ बॅटऱ्या आढळल्या. वारंवार मिळणारे मोबाईल, बॅटऱ्या आणि सीमकार्डमुळे हे कारागृह की मोबाईल शॉपी असा प्रश्न एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गंमतीने उपस्थित केला.
च्बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्यप्रदेश), शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (२४), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादुर गुप्ता (२५), प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (२४) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (२३) या खतरनाक कैद्यांनी मंगळवारी पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले.
च्मंगळवारी दुपारी कारागृह अधीक्षक वैभव कांबळेला आणि गुरुवारी दुपारी आर. जी. पारेकर तसेच एस. यू. महाशिखरे या दोन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे कारागृहातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ‘लपवाछपवी मोहीम‘ हाती घेतली.
च्अनेक प्रतिबंधित चिजवस्तू लपविण्यात आल्या. त्याचपैकी २६ मोबाईल, ३ सीमकार्ड आणि २८ बॅटऱ्या पोलिसांच्या हाती लागल्या. हे मोबाईल आणि सीमकार्ड कुणाचे त्याचा सीडीआरच्या माध्यमातून छडा लावल्या जाणार असल्याची माहिती धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांनी लोकमतला दिली. मोबाईल व बॅटऱ्यांमूळे ठिकठिकाणचे तपास अधिकारीही अवाक् झाले आहेत.
पाच कर्मचारी निलंबित
च्खतरनाक कैद्यांच्या पलायन प्रकरणात दोषी आढळलेल्या पाच कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. राजू पाटील, मंगेश प्रजापती, रमेश ढेकळे, अशोक भांडारकर आणि संजय ठोकळ, अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
च्लोकमतने कारागृहातील गैरप्रकाराची लक्तरे वेशीवर टांगतानाच शुक्रवारी एका व्हीडीओ क्लीपच्या आधारे धक्कादायक वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. मुख्यमंत्री कार्यालय, गृहराज्यमंत्रालय, पोलीस महासंचालनालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीच्या अहवालाची सारखी मागणी होऊ लागली. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासून तपासाला वेग आला.
च्एवढे खतरनाक कैदी कारागृहातून पळाले, त्यावेळी बरॅक क्रमांक ६ च्या आजूबाजूला कुणाची ड्युटी होती. त्याची चौकशी केल्यानंतर उपरोक्त पाच कर्मचाऱ्यांची नावे सर्वप्रथम पुढे आली. या कर्मचाऱ्यांना घटनेबाबत वरिष्ठांकडून विचारणा करण्यात आली असता प्रत्येकाने विसंगत माहिती दिल्याचे समजते.
च्भेटीला येणाऱ्या व्यक्तीच्या येण्यापासून जाण्यापर्यंतच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनातील कर्मचाऱ्यांची असते. त्यांच्या साथीला स्थानिक पोलीसही असतात. या साऱ्यांच्याच डोळ्यावर नोटांची झापडं लावल्या जात असल्यामुळे ते भेटीला येणाऱ्यावर नजर ठेवण्याची तसदीच घेत नव्हते. नियमानुसार जास्तीत जास्त २० मिनिटे भेटीचा वेळ असतो. मात्र, अनेक कैदी प्रदीर्घ ‘संवाद’ साधायचे. याउलट एखाद्या कैद्याच्या गोरगरीब नातेवाईकाला वेळेपूर्वीच बाहेर हुसकावून लावले जायचे.