केरळ टूरच्या नावाखाली ग्राहकाची फसवणूक
By Admin | Updated: June 9, 2016 06:17 IST2016-06-09T06:17:23+5:302016-06-09T06:17:23+5:30
ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या चैतन्य हॉलिडेजला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.

केरळ टूरच्या नावाखाली ग्राहकाची फसवणूक
ठाणे : केरळ टूरच्या नावाखाली पैसे घेऊन अयोग्य सेवा देणाऱ्या तसेच रक्कमही परत न देता ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या चैतन्य हॉलिडेजला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.दहिसर येथे राहणारे फिलीप सेराओ यांनी ठाण्यातील चैतन्य हॉलिडेज प्रा.लि.च्या पॅकेज टूर्सची माहिती वाचली होती. सेराओ यांनी त्यांच्याशी संपर्क करून १३ एप्रिल ते १९ एप्रिल २०१४ दरम्यान केरळ टूरवर जाण्याचे निश्चित केले. त्यासाठी १३ मार्चला धनादेशाने एक लाख आणि उर्वरित
२४ हजार ५ एप्रिलला दिले. हॉलिडेजने त्यांना १३ एप्रिलला विमानाचे बुकिंग केल्याचे सांगितले. त्यानुसार, फिलीप कुटुंबासह विमानतळावर पोहोचले. मात्र, त्या वेळी केरळला जाणारे कोणतेही विमान उपलब्ध नव्हते.
त्यांनी हॉलिडेजशी संपर्क साधला असता विमान रद्द झाले असून पुढील आठवड्यात विमान उपलब्ध असेल, असे सांगितले.
मात्र, तेव्हाही विमान उपलब्ध नव्हते. अखेर, फिलीप यांनी हॉलिडेजकडे टूरकरिता दिलेली रक्कम परत मागितली. तीसुद्धा न दिल्याने त्यांनी चैतन्य हॉलिडेजविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी मंचाने केली. टूरबाबत जाहिरातीचे कात्रण, बुकिंग फॉर्म, रक्कम भरल्याच्या पावत्या, वेळापत्रक, विमानाच्या बुकिंगची स्लिप, बुकिंग रूमची माहिती मंचाने घेतली.
फिलीप यांनी इंटरनेटवरून वेळापत्रक पाहिले असता हॉलिडेजने कळवलेल्या क्रमांकाचे, वेळेचे विमानच नव्हते. त्यामुळे हॉलिडेजने चुकीची माहिती देऊन तसेच रक्कम परत न करून त्यांची
फसवणूक केली आहे, असा
निष्कर्ष मंचाने काढला. त्यामुळे फिलीप यांना टूरचे १ लाख २४ हजार आणि ५० हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मंचाने दिले आहेत. (प्रतिनिधी)