चलनातून बाद झालेल्या ४ लाख ९२ हजाराच्या नोटासह हमाल पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 20:11 IST2017-10-14T19:47:23+5:302017-10-14T20:11:34+5:30
चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ९९२ नोटा घेऊन फिरणा-या एका हमालाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

चलनातून बाद झालेल्या ४ लाख ९२ हजाराच्या नोटासह हमाल पोलिसांच्या ताब्यात
औरंगाबाद, दि. १४ : चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ९९२ नोटा घेऊन फिरणा-या एका हमालाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बाजारात या नोटांची किंमत शून्य आहे, असे असले तरी या नोटा त्याने कोठून आणल्या आणि त्याचे तो काय करणार होता याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला. विशेष म्हणजे बनावट नोटा बाळगणा-याविरूद्ध कारवाई करण्यासाठी यावर्षी अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसार झालेली महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे.
इम्तियाज खान अन्वरखान (वय २९,रा. खडकपुरा,जालना)असे ताब्यात घेतलेल्या तरूण हमालाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले की, चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन एक जण एमआयडीसी वाळूज परिसरात येणार असल्याची माहिती खब-याकडून मिळाली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे आणि पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख,कर्मचारी वसंत शेळके, कारभारी देवरे,प्रकाश गायकवाड,सुधीर सोनवणे, मनमोहनमुरलीधर कोलमी,संतोष जाधव,बंडू गोरे यांनी एमआयडीसी रोडवरील सापळा रचला. तेव्हा आरोपी इम्तियाज हा एका कॅरीबॅगमध्ये नोटा घेऊन जात असल्याचे पथकाला दिसले.
पथकाने लगेच त्यास पकडले. यावेळी त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडील कॅरिबॅगमध्ये चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपये चलनाच्या ९९२ नोटा मिळाल्या.या नोटांची तत्कालीन किंमत ४ लाख ९२ हजार रुपये होती. केंद्र सरकारने वारंवार संधी देऊनही अनेकांना त्यांच्याकडील काळे धन समोर आणता आलेले नाही. करचुकवून जमविलेल्या संपत्तीच्या या नोटा असाव्यात असा पोलिसांना सशंय आहे.
केंद्र सरकारने चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणा-याविरूद्ध कारवाईसाठी विशेष कायदा केला आहे.या कायद्यानुसार जुन्या नोटा बाळगणा-यास एकूण नोटांच्या पाच पट दंडाची तरतूद करण्यात आली. या कायद्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी सांगितले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करून या प्रकरणी तपास करण्यासाठी परवानगी घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.