मांसाहारावरील वादावर पडदा
By Admin | Updated: September 14, 2015 02:50 IST2015-09-14T02:50:04+5:302015-09-14T02:50:04+5:30
जैन समाज बांधवांचे आणि शिवसेनेचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. ते पुढेही राहतील, असे सांगत पर्युषण काळातील मांसविक्री बंदीवरून निर्माण झालेल्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला.

मांसाहारावरील वादावर पडदा
मुंबई : जैन समाज बांधवांचे आणि शिवसेनेचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. ते पुढेही राहतील, असे सांगत पर्युषण काळातील मांसविक्री बंदीवरून निर्माण झालेल्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पडदा टाकला.
पर्युषण काळातील मांसविक्री बंदीवरून वाद उफाळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो) च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष किरण मेहता व हिरे व्यापारी भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेबरोबर आमचा संघर्ष नाही. त्यामुळे हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती त्यांनी केली.
या भेटीनंतर उद्धव म्हणाले, की दरवर्षी पर्युषण काळात दोन दिवसांची मांसविक्री बंदी केली जाते. यंदा मीरा-भाईंदर महापालिकेने आठ दिवस मांसविक्री बंद करून या वादाला तोंड फोडले. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात पाळावा. असे झाले तर एकमेकांना एकमेकांच्या सणाच्या शुभेच्छा देण्याची रंगत आहे. शिवसेनेलाही हा वाद वाढवायचा नसून, आम्ही या वादावर पडदा पाडतो, असे ते म्हणाले.
शिष्टमंडळात ‘जितो’चे धीरज कोठारी, भारत जैन मंडळाचे बाबुलाल बाफना, भरत डायमंड हाऊसचे अनुप मेहता, सांताक्रूझ जैन संघाचे किरीट भन्साळी, नितीश दोशी यांचा समावेश होता. (विशेष प्रतिनिधी)