करी रोड येथील वाणी चाळीला आग

By Admin | Updated: May 30, 2016 02:01 IST2016-05-30T02:01:04+5:302016-05-30T02:01:04+5:30

करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या वाणी चाळ इमारत क्रमांक ३ला रविवारी सायंकाळी आग लागली

Curry Road voice fire on fire | करी रोड येथील वाणी चाळीला आग

करी रोड येथील वाणी चाळीला आग


मुंबई : करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या वाणी चाळ इमारत क्रमांक ३ला रविवारी सायंकाळी आग लागली. आग विझविण्यासाठी वेळेत दाखल झालेल्या अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टाळण्यात यश आले.
चाळीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या शेंडूरकर ग्रामस्थ मंडळाच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला सायंकाळी ७च्या सुमारास आग लागली. दरम्यान, सिलिंडरचा भडका झाल्याने घरातील सर्वांनी चाळीबाहेर धाव घेतली. मात्र सिलिंडरचा स्फोट झाल्याने मजल्याच्या परिसरात वाळत घातलेले कपडे आणि शोभेच्या पताक्यांनी पेट घेतला. त्यामुळे पहिल्या मजल्यावरील सुमारे १० घरे आगीत होरपळली.
लोकांची धावपळ सुरू असताना पहिल्या मजल्यावरील एका घरात वृद्ध नागरिक अडकून राहिल्याचे कळाले. चालता येत नसल्याने त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. अशातच ते बेशुद्ध पडले. मात्र तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या वृद्धाची सुखरूप सुटका केली. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली नव्हती.
अशावेळी पोलिसांनी तत्परता दाखवत अधिक उपचारासाठी वृद्धाला वायरलेसमधून नायर रुग्णालयात हलवले. रात्री ८च्या सुमारास अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Curry Road voice fire on fire