सध्याचा कालखंड धार्मिक विद्वेषाचा
By Admin | Updated: January 4, 2016 03:15 IST2016-01-04T03:15:17+5:302016-01-04T03:15:17+5:30
सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले

सध्याचा कालखंड धार्मिक विद्वेषाचा
नाशिक : सध्याचा कालखंड धार्मिक, जातीय विद्वेषाने भरलेला असून, राज्यघटनेची चौकट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरणे म्हणजे स्वत:वर गोळ्या झाडण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. अशा काळात धर्मनिरपेक्षतेची चळवळ जिवंत राहण्यासाठी प्राणपणाने लढा चालू ठेवण्याची, महाराष्ट्र व कर्नाटकातील पुरोगामी चळवळींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी रविवारी मांडले.
सिडकोतील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले, त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या शिष्या आणि कर्नाटकातील बंडखोर कवयित्री सुकन्या मारुती यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. दाभोलकर म्हणाले, अनेक महिने उलटूनही दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नाही. अशा कालखंडात मारुती यांचा गौरव परिवर्तनासाठीचा लढा थांबवणार नसल्याचा निर्धार व्यक्त करणारा आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील विचारवंतांना संपवले, तरी घाबरून न जाता दोन्ही राज्यांतील पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन पुढे वाटचाल करावी व देशातील सनातन्यांसमोर उदाहरण उभे करावे, असे ते म्हणाले.