सात गावांची संचारबंदी शिथिल

By Admin | Updated: October 16, 2016 02:29 IST2016-10-16T02:29:38+5:302016-10-16T02:29:38+5:30

तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त

Curbing of seven villages loosened | सात गावांची संचारबंदी शिथिल

सात गावांची संचारबंदी शिथिल

नाशिक : तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. रविवारच्या जाळपोळ, दगडफेक व लुटालुटीच्या घटनेनंतर, इगतपुरी, नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आठ गावांमध्ये सोमवारपासून संचारबंदी जारी करण्यात आली होती. समाजकंटकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर दगडफेक करत, वाहने पेटवून दिली होती. ग्रामीण भागात रहिवाशांवरही हल्ले झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तर पाडळी येथे जमाव नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबाराच्या फैरीही झाडाव्या लागल्या. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच, विल्होळी, वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, शेवगेडांग, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव, तळवाडे या गावांमध्ये सलग ७२ तास संचारबंदी जारी करण्यात आली होती. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नसली, तरी खबरदारी म्हणून शुक्रवारी मुदत संपल्यानंतरही पोलीस व प्रशासनाने संचारबंदीत पुन्हा २४ तासांनी वाढ केली होती. त्याची मुदत शनिवारी दुपारी संपल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले.
शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पुन्हा वाडीवऱ्हे, गोंदे, सांजेगाव, महिरावणी, अंजनेरी, तळेगाव व तळवाडे या सहा गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारी परिस्थिती पाहून संचारबंदी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Curbing of seven villages loosened