संस्कृतीच्या घरची चूलही पेटलीच नाही...
By Admin | Updated: March 3, 2015 00:27 IST2015-03-02T23:14:31+5:302015-03-03T00:27:23+5:30
एक उदास रात्र... : बेपत्ता झालेल्या बालिकेच्या शोधासाठी अख्खा गाव पोलिसांच्या मदतीला

संस्कृतीच्या घरची चूलही पेटलीच नाही...
देवरुख : वय केवळ १ वर्ष आठ महिने... निरागस गोड हसरा चेहरा. बोलायला न लागलेली एक चिमुरडी दुकानाजवळून आईचा हात सोडून अनाकलनीयरित्या गायब होते आणि आई-कुटुंबांसह गावातील ग्रामस्थांच्या जीवाची घालमेल उडते. रविवारी दुपारच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील कडवई - धुळपवाडी येथे ही घटना घडली. तत्काळ कर्णोपकर्णी झाली. कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थांसह पोलिसांची एकच धावपळ! त्या रात्री त्या घरातील चूल पेटलीच नाही.
संस्कृती शशिकांत धुळप ही चिमुरडी साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवून गायब झाली. तब्बल रविवारी दुपारी २ वाजल्यापासून सलग १५ तास म्हणजेच सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत शोध मोहीम करण्यात आली. पाऊस, थंडी वारा आणि रात्री काळोख असा सामना करीत अखंड शोध सुरु होता.
संस्कृती ही कष्टकरी कुटुंबातील धुळप कुटुंबियांची मोठी मुलगी. रविवारी घरातील मंडळी म्हणजेच आजी, काका-काकी आणि वडील नातेवाईकांच्या लग्नाला गावाशेजारी गेलेले. यावेळी घरात फक्त तिघेच. संस्कृतीसह तिचा ४-५ महिन्यांचा लहान भाऊ आणि आई शमिका धुळप होती. घरी दुपारच्या वेळेस आवश्यक असणारा जिन्नस आणायला म्हणून घराच्या बाजूलाच मायलेकी बाहेर पडल्या होत्या. मात्र, यावेळी बोट धरुन आईसोबत बाहेर पडलेली चिमुरडी संस्कृती आईबरोबर सोबत घरी परतलीच नाही.
यावेळी मात्र संस्कृतीच्या आईच्या काळजाचे पाणी झाले. घरी पाळण्यात ४ महिन्यांचा लहान मुलगा होता. याला घेऊन या मुलीला शोधायचे कसे, असा मोठा प्रश्न उभा राहिलेला. घरातील सगळे लग्नाला गेलेले अशा परिस्थितीत मनाला धीर देत शमिकाने मोबाईलच्या सहाय्याने पतीला झाला प्रकार सांगितला. कशाचीही तमा न बाळगता स्थानिक युवक, गावकरी ग्रामस्थ आणि कुटुंबियांसह नातेवाईकांनी वाडी, वस्ती, गाव जंगल पालथे घातले. मात्र, १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतरदेखील संस्कृती सापडली नाही.
रात्री संस्कृतीच्या घरची चूल पेटली नाही. उपाशीपोटीच या मुलीचा शोध सुरु होता. मात्र, या साऱ्या मोहिमेनंतर हतबल होऊन परत आलेल्या ग्रामस्थांना कुटुंबियांना चांगली बातमी मिळाली आणि गंगाराम धुळप-तुकाराम उजगावकर या ग्रामस्थांना संस्कृतीचे रडणे ऐकू आले. घरापासून सुमारे दीड ते पावणेदोन किमी अंतरावरील जंगलात ही चिमुरडी सुरक्षित सापडल्याने साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्वाधिक आनंद होता तो तिच्या चेहऱ्यावर! (प्रतिनिधी)