पुणे : यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादच्या भूमीत संमेलन होत आहे. उस्मानाबाद आणि पर्यायाने मराठवाड्याची सांस्कृतिक परंपरा उलगडणारी ‘पोत’ ही स्मरणिका संमेलनात साहित्यप्रेमींच्या भेटीला येणार आहे. बोलीभाषा हे यंदाच्या स्मरणिकेचे वैशिष्टय असेल. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, भास्कर चंदनशिव आणि सेतू माधवराव पगडी यांचे परिचयलेखन स्मरणिकेच्या केंद्रस्थानी असेल. उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. जिल्ह्याला मोठी साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच समृध्द संत परंपरा लाभली आहे. जिल्ह्याच्या परंपरेचा परामर्श स्मरणिकेतील लेखांमधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्मरणिका ही साहित्यरसिकांच्या आवडीचा विषय असतो. त्यातून संमेलनस्थळाचे महत्व अधोरेखित होत असते. त्यामुळेच ‘पोत’विषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. तुळजाभवानीच्या पूजाविधीत पोत ओवाळणे हा महत्त्वाचा विधी आहे. त्याचप्रमाणे, ‘पोत’चा दर्जा, सुधारणा असाही अर्थ होतो. यादृष्टीने हे नाव निवडण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘पोत’ या स्मरणिकेमध्ये बोलीभाषांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, उस्मानाबादचे पर्यटन, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास यावर भर देण्यात आला आहे. मराठवाड्यात आजवर झालेली साहित्य संमेलने, बोलीभाषांचा इतिहास, प्रवास आणि सद्यस्थिती, नोटाबंदीच्या निर्णयानंतरचे उस्मानाबाद अशा विविध विषयांवरील सुमारे २२ लेखांचा स्मरणिकेमध्ये समावेश आहे.‘पोत’मध्ये इंद्रजित भालेराव, केशव देशमुख, विद्या देवधर, एम.डी.देशमुख आदी लेखकांच्या लेखांचा समावेश असून, ती साधारणपणे १०० पानांची असेल. गोरोबा काकांची साहित्य परंपरा असलेला हा जिल्हा आहे. त्यादृष्टीने स्मरणिकेची रचना करण्यात आली आहे. स्मरणिकेसाठी विशेष संपादक मंडळ तयार करण्यात आले होते. राजेंद्र अत्रे, कमल नलावडे,भा.न.शेळके, बालाजी तांबे, डॉ. प्रशांत चौधरी आदी मान्यवरांच्या संपादक मंडळाने ‘पोत’ या स्मरणिकेची जबाबदारी उचलली आहे.------------- स्मरणिकेची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे असते, असा सर्वसाधारण समज आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वागत मंडळाने केलेले काम, संमेलनातील मुख्य विषय, त्यांची निवड आदी विषयांचा समावेश स्मरणिकेमध्ये असतो. संपादक मंडळही स्वागताध्यक्षांनी नेमलेले असते. संपादक मंडळ लेखकांविषयी महामंडळाशी चर्चा करते. मात्र, यंदा स्वागत मंडळाला स्मरणिकेबाबत पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
‘पोत’ स्मरणिकेतून उलगडणार उस्मानाबादचा सांस्कृतिक वारसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 23:10 IST
उस्मानाबाद आणि पर्यायाने मराठवाड्याची सांस्कृतिक परंपरा उलगडणारी ‘पोत’ ही स्मरणिका
‘पोत’ स्मरणिकेतून उलगडणार उस्मानाबादचा सांस्कृतिक वारसा
ठळक मुद्देफादर फ्रान्सिस दिब्रिटो, भास्कर चंदनशिव आणि सेतू माधवराव पगडी यांचे परिचयलेखन स्मरणिकेच्या केंद्रस्थानी जिल्ह्याला मोठी साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच समृध्द संत परंपरा