अति धोकादायक इमारती जमीनदोस्त
By Admin | Updated: June 30, 2015 03:06 IST2015-06-30T03:06:12+5:302015-06-30T03:06:12+5:30
ठाणे महापालिकेची अतिधोकादायक इमारतीवरींल कारवाई अद्याप सुरुच आहे. पालिकेने आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर हातोडा टाकला आहे.

अति धोकादायक इमारती जमीनदोस्त
ठाणे : ठाणे महापालिकेची अतिधोकादायक इमारतीवरींल कारवाई अद्याप सुरुच आहे. पालिकेने आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर हातोडा टाकला आहे. विशेष म्हणजे यादीत समाविष्ट नसलेल्या परंतु ज्या मोडकळीस आल्या आहेत, अशा सात ते आठ इमारतींवरही कारवाई केली आहे. परंतु, दुसरीकडे पावसाळ्याचा पहिला महिना संपला तरीदेखील मुंब्य्रातील कारवाईचा वेग फारसा वाढलेला नाही. आतापर्यंत येथील २७ पैकी केवळ दोनच इमारतींवर कारवाई झाली आहे. येथील रहिवाशांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याचे पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंब्य्रातील शिळफाटा भागात झालेल्या लकी कंपाऊंड इमारत दुर्घटननंतर पालिकेने या भागात विशेष मोहीम आखून इमारतींवर कारवाईचा सपाटा सुरु केला होता. दोन वर्षापूर्वी या भागात तीन ते चार इमारतीं पडून सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा भाग, पालिकेच्या रडावर राहिला आहे.
३१ मे पर्यंत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. जून महिन्यात पालिकेने विविध प्रभाग समितीमधील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करून आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर कारवाई केली. रोज विविध भागात ही कारवाई सुरुच आहे.
अतिधोकादायक २७ इमारती या मुंब्रा प्रभाग समितीत आहेत. शिवाय या भागात अशा इमारतींची संख्याही तब्बल १४१९ एवढी आहे. पालिकेने आता या सर्व इमारतधारकांना नोटीसा पाठविण्यास सुरवात केली आहे. सुरवातीला बंदोबस्त मिळत नाही म्हणून कारवाईला ब्रेक लागला होता. परंतु आता पोलीस बंदोबस्त मिळत असला तरीदेखील, येथील रहिवाशांनी इमारती खाली करण्यास आणखी एक महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे कारवाईला पुन्हा एक महिन्याचा ब्रेक लागणार आहे.
दरम्यान, ३१ मे पर्यंत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. परंतु या कालावधीत तीन ते चार इमारतींवरच हातोडा पडला होता. जून महिन्यात आतापर्यंत ५८ पैकी ३६ इमारतींवर कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.