सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ ही क्रूरताच
By Admin | Updated: December 31, 2015 01:14 IST2015-12-31T01:14:43+5:302015-12-31T01:14:43+5:30
सार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने

सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ ही क्रूरताच
मुंबई: सार्वजनिक ठिकाणी पत्नीशी व्यवहार करताना तिची बदनामी होईल, अशी भाषा वापरणे आणि सातत्याने तिला शिवीगाळ करणे, ही एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत वांद्रे कुटुंब न्यायालयाने ३० वर्षीय महिलेला तिच्या ४४ वर्षीय पतीपासून घटस्फोट दिला.
काव्या पटेल (बदलेले नाव) या ३० वर्षीय महिलेचा २०१० मध्ये हर्षद पटेल (बदलेले नाव) याच्याशी विवाह झाला. हर्षदचा याआधीही त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. काव्याबरोबर विवाह झाल्यानंतर हर्षदने त्याची सगळी मालमत्ता पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाच्या नावावर केली.
विवाह झाल्यानंतर लगेचच या दोघांमध्ये वाद सुरू झाले. काव्याने केलेल्या अर्जानुसार, हे दोघेही इजिप्तला हनीमूनसाठी गेल्यावर हर्षदने तिच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीवरून वाद घालणे सुरु केले. विवाहापूर्वीच हर्षदला या सवयीची पूर्ण जाणीव दिली होती, तरीही हर्षदने चारचौघांत सिगरेट ओढण्यावरून इजिप्तमध्ये भांडण केले. त्यानंतर ती ओडिशामध्ये कौटुंबिक सोहळ््यासाठी गेली असता तिथेही हर्षदने तिच्या नातेवाईकांसमोर वाद घालणे सुरु करत तिची बदनामी केली. तसेच खूप शिवीगाळही केली. याप्रकारामुळे काव्याची आईही कमालीची दुखावली गेली. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कुटुंब न्यायालयाने हर्षदला यावर त्याचे म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र हर्षदने काहीच प्रतिसाद न दिल्याने या याचिकेवरील सुनावणी एकतर्फी झाली. ‘पत्नीने केलेल्या आरोपांना आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे पती क्रूर आणि शिवीगाळ करणारा असल्याचे सिद्ध झाले,’ असे म्हणत कुटुंब न्यायालयाने काव्याचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. (प्रतिनिधी)