बीआरटी थांब्यासमोर खड्डा
By Admin | Updated: September 20, 2016 02:00 IST2016-09-20T02:00:09+5:302016-09-20T02:00:09+5:30
बीआरटी बसस्टॉपसमोर गेल्या एक महिन्यापासून ड्रेनेज पाइपलाइन फुटलेली असून, त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.

बीआरटी थांब्यासमोर खड्डा
येरवडा : येथील पर्णकुटी चौकानजीक कटारिया हॉस्पिटलसमोर आणि नगररोडकडे जाणाऱ्या येरवड्यातील पहिल्याच बीआरटी बसस्टॉपसमोर गेल्या एक महिन्यापासून ड्रेनेज पाइपलाइन फुटलेली असून, त्या ठिकाणी मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या मोठ्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचल्याने त्या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, तेथील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना उग्र वासाला सामोरे जावे लागत आहे.
सद्य:स्थितीत डेंगी तसेच चिकुनगुनिया या साथीच्या रोगांचा येरवडा परिसहासह संपूर्ण पुणे शहरात फैलाव झाला असल्याने सद्य:स्थितीत येथे असलेल्या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांचे आणि कटारिया हॉस्पिटलच्या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच परिसरात तीन महत्त्वाच्या बँका असल्याने या बँकांमध्ये आर्थिक व्यवहार करण्यासाठी दररोज हजारो स्त्री-पुरुष नागरिक परिसरातून ये-जा करीत असतात. त्यांनाही ड्रेनेजलाइनच्या साठलेल्या या पाण्याच्या दुर्गंधीचा आणि अवस्छतेचा तसेच तेथील साठलेल्या पाण्यातील गेल्या एक महिन्यापासून वाढत झालेल्या डास आणि मच्छरांच्या प्रभावाचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक त्रास होत आहे. त्याच परिसरात प्रिन्स हॉटेल, प्रिन्स कपड्याचे दुकान, फळविक्रेते, पथारीवाले व्यवसाय करीत असतात. तेथे ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या परिसरातील वातावरणाचा गंभीर त्रास होत आहे.
तेथील खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये जे साचलेले ड्रेनेजचे पाणी आहे ते शेजारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या घरातील मैला, तसेच मलमूत्राचा पाइपलाइनमधून बाहेर पडत आहे. या सर्व परिस्थितीबाबत स्थानिक नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका मीना परदेशी यांचे पती रवी परदेशी, येरवडा क्षेत्रीय कार्यालय ड्रेनेज विभागाचे संबंधित अधिकारी, विभागीय आरोग्याधिकारी, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आदी अधिकाऱ्यांना वारंवार आणि वेळोवेळी सांगूनही सर्वांनीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे.
याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी, अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने पुणे महापालिकेवर तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (वार्ताहर)
दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावा
या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील ड्रेनेजलाइनच्या पाइपलाइनमधून बाहेर पडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त व डास आणि मच्छरयुक्त पाण्यामध्ये औषध फवारणी करणे गरजेचे आहे.
तसेच लवकरात लवकर तेथील ड्रेनेजलाइनची दुुरुस्ती करून खड्ड्याच्या जवळपास टाकण्यात आलेल्या पाइपलाइनची जोडणी त्वरित करावी आणि स्थानिक नागरिकांची होणारी वाहतुकीची तसेच आरोग्याची हेळसांड ताबडतोब थांबवावी, ही आमची स्थानिक नागरिकांच्या वतीने रास्त मागणी करण्यात आली आहे.