खंडोबा गडावर भाविकांची गर्दी
By Admin | Updated: November 27, 2014 23:12 IST2014-11-27T23:12:24+5:302014-11-27T23:12:24+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबादेवाचे चंपाषष्ठीनिमित्त आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मागशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची आज सांगता झाली.

खंडोबा गडावर भाविकांची गर्दी
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबादेवाचे चंपाषष्ठीनिमित्त आज हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मागशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची आज सांगता झाली.
खंडोबाला वांग्याचे भरीत-रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य आज दाखविण्यात आला. चातुर्मास पाळणारे भक्त आजपासून कांदा, वांगी, लसूण खाण्यास प्रारंभ करतात. बुधवारपासूनच जेजुरीत हजारो भाविक मुक्कामी आले होते. सकाळी येथील ग्रामस्थांच्या मानाच्या पूजा झाल्यावर दर्शनासाठी भाविकांच्या मोठय़ा रांगा लागल्या. हातात पेटवलेल्या दिवटय़ा घेऊन गडावर हजारो भाविकांनी तळी-भंडारा करून भंडार-खोब:याची प्रचंड उधळण केली. मोठय़ा श्रद्धेने देवाला कांद्याची पात, रोडगा, वांगी आदी अर्पण करण्यात आले. चंपाषष्ठीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात घरोघर खंडोबाचा कुळधर्म-कुळाचार केला जातो. या वेळी बसविलेले घट उठविले जातात.
बुधवारी (दि. 26) सायंकाळी प्रथेनुसार देवाला तेलवण करण्याचा विधी झाला. तेलहंडय़ाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी या हंडय़ात तेल आणून ओतले. परत हंडा गडावर आणल्यावर त्यातील तेलाने खंडोबा व म्हाळसादेवी यांना तेल-हळद लावण्यात आली. फुलांची सजावट करून देवाला मुंडावळ्या बांधण्यात आल्या. रुखवत मांडण्यात आला.
सनई-चौघडय़ाच्या मंगल स्वरांत खंडोबा नवरा, म्हाळसा नवरी यांची पारंपरिक गाणी म्हणण्यात आली. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला खंडोबादेवाला तेल-हळद लागते व देवाचे पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेला लग्न होते. लग्न करून आल्यावर चैत्र पौर्णिमेला वरात निघते. (वार्ताहर)
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला खंडोबाने मणिसुर व मल्लासुर या दैत्यांचा वध केला व लिंगद्वरूपाने देव प्रगट झाले, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच येथे देवाच्या दर्शनासाठी मोठी यात्र भरते. पुजारी-सेवक व देवस्थान कमर्चारी वर्गाकडून 6 दिवस चालणा:या षड्रात्र उत्सवाचे आयोजन अत्यंत धार्मिक वातावरणात करण्यात आले होते.