कल्याणात चोरांच्या अफवांचे पीक

By Admin | Updated: December 27, 2014 04:33 IST2014-12-27T04:33:21+5:302014-12-27T04:33:21+5:30

रस्त्यात, जंगलात कोठेही अडवून नाक, कान, कापतात. त्यांच्या अंगावर कपडे नाहीत. अंगाला तेल लावून काळेकुट्ट दिसतात. त्यांच्या गँगमध्ये महिलाही आहेत

Crop rumors in Kalyan | कल्याणात चोरांच्या अफवांचे पीक

कल्याणात चोरांच्या अफवांचे पीक

संजय कांबळे,बिर्लागेट (कल्याण)
रस्त्यात, जंगलात कोठेही अडवून नाक, कान, कापतात. त्यांच्या अंगावर कपडे नाहीत. अंगाला तेल लावून काळेकुट्ट दिसतात. त्यांच्या गँगमध्ये महिलाही आहेत. अशा एक ना अनेक अफवांचे पीक सध्या कल्याण ग्रामीण भागात पसरले आहे. त्यामुळे एका तरुणाला बेदम मार खावा लागला. या चोरांच्या अफवांमुळे सायंकाळी ६ नंतर कोणीही घराबाहेर पडेनासे झाले आहे.
या चोरांच्या अफवांमुळे गावातील तरुण मंडळी गस्त घालण्याचे काम करीत आहे. अशीच गस्त घालत असताना मानिवली-रायता रस्त्याच्या बाजूला असलेल्या बेड्यामध्ये एक जण झोपल्याची बातमी गावात पसरली, अन् तरुण पोरं मागे धावली. तो जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळू लागला. मात्र, संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडलाच आणि इतक्या दिवसांचा राग काढला. तो सर्वांना विनवण्या करीत होता. माझी कागदपत्रे तपासा, मी पोलीस भरतीसाठी आलोय, पण कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यातच तो कधी आंध्र प्रदेश, सोलापूर अशा भागाची नावे सांगू लागल्याने लोकांचा संशय बळावला. तोपर्यंत त्याला बेदम चोप देण्यात आला होता. अखेर, लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अशा या चोरांच्या अफवांचे पीक तालुक्यातील सर्वच गावांत पसरले असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकाराबाबत टिटवाळा तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, अद्यापपर्यंत आमच्या पोलीस ठाण्यात एकही केस दाखल झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली. तर सर्वत्र चोरांच्या मोठ्या अफवा आहेत. त्यामुळे भर उन्हात किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडायला भीती वाटते, अशी प्रतिक्रिया कल्याण तालुक्यातील चौरे गावातील रहिवाशी कविता ठाकरे यांनी दिली.

Web Title: Crop rumors in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.