बळीराजाच्या आधाराला पीक विमा

By Admin | Updated: April 30, 2016 03:19 IST2016-04-30T03:19:08+5:302016-04-30T03:19:08+5:30

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय जमीन पत्रिका अभियान, मनरेगा अशा योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे प्रकाशन केले होते.

Crop Insurance on the basis of Baliaraja | बळीराजाच्या आधाराला पीक विमा

बळीराजाच्या आधाराला पीक विमा

पालघर/नंडोरे : पालघर जिल्ह्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत अलीकडेच पालकमंत्र्यांच्याहस्ते मृद आरोग्य पत्रिका, ग्रामोदय से भारत उदय, पंतप्रधान पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय जमीन पत्रिका अभियान, मनरेगा अशा योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे प्रकाशन केले होते. ठाणे व पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या कृषी योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने नंतर पंतप्रधान पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार सिद्ध होणार आहे.
या विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. विमा सुरक्षा रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजुर कर्ज मर्यादेइतकी राहणार असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हक्क दर खरीप हंगामासाठी २ टक्के रब्बी हंगामासाठी १.५० टक्के तर नगदी पिकासाठी ५ टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना या योजनेत पिक व पेरणी केल्यापासून पिक काढणीपर्यंतच्या वेळेत किंवा कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घट मध्येही लाभ मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रिवादळ, पुर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी सारखे शेतकऱ्यांना टाळता न येण्यासारख्या कारणांमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठीही पीक विमा योजनेचे संरक्षण मिळणार आहे.
अपुरा पाऊस तसेच हवामानाच्या इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचीत केलेल्या मुख्य पिकांची ठरवलेल्या
क्षेत्रात व्यापक प्रमाणात पेरणी/लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (पेरणी/लावणी नसलेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त) एकूण विमा संरक्षणाच्या रक्कमेपैकी २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. (वार्ताहर)
>कृषी विभागाचे आवाहन
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ३१ जुलै २०१६ व रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असून या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लक्षांक शेतकऱ्यांना समाविष्ठ करण्याचा व पिक विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा कृषी विभाग करीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रकल्प संचालक (आत्मा) ठाणे व जिल्हा कृषी अधिक्षक पालघर यांनी
केले आहे.
४८ तासांत माहिती देणे राहणार बंधनकारक
चक्रिवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर या पिकांचे पंचनामे करूनच नुकसान भरपाई निश्चित केली जाईल व हे नुकसान झाल्यानंतर किमान १४ दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील.
या योजनेअंतर्गत पुराचे पाणी शेतात शिरून झालेले नुकसान, भुस्खलन किंवा गारपीट अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीत ही नुकसान भरपाई वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येतील.
या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी किंवा पीक वीमा योजना काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई झाल्यापासून ४८ तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसुचीत पिकांची माहिती, नुकसान झाल्याचे कारण व नुकसान झालेले प्रमाण संबंधित विमा कंपनीत कळविणे आवश्यक आहे.

Web Title: Crop Insurance on the basis of Baliaraja