नाले, गटारांवरील निकृष्ट झाकणे की मृत्यूचे सापळे

By Admin | Updated: June 27, 2016 02:37 IST2016-06-27T02:37:29+5:302016-06-27T02:37:29+5:30

वास्तविक, हा विषय येथेच संपत नाही. लोकवस्तीत झाकण नसलेल्या नाल्याजवळ अथवा गटाराजवळ अशा घटना नेहमी घडत असतात.

Critical veils or death traps of sewers, drains | नाले, गटारांवरील निकृष्ट झाकणे की मृत्यूचे सापळे

नाले, गटारांवरील निकृष्ट झाकणे की मृत्यूचे सापळे

- पंढरीनाथ कुंभार

वास्तविक, हा विषय येथेच संपत नाही. लोकवस्तीत झाकण नसलेल्या नाल्याजवळ अथवा गटाराजवळ अशा घटना नेहमी घडत असतात. यापूर्वी २०१३ साली पावसाळ्यात याच झाकण नसलेल्या नाल्यात पडलेली एक मुलगी वाहून गेली होती. भरपावसात तीन दिवस तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. शांतीनगर भागात गुलजारनगर, वॉर्ड क्र. १९ मध्ये हा नाला असून या नाल्यावर मनपाने लावलेली लोखंडी जाळ्यांची झाकणे चोरली जात आहेत. त्यामुळे उघड्या नाल्यात जनावरेदेखील पडून मेली आहेत. दीड वर्षापूर्वी गोणीत बांधलेले प्रेत सापडले होते. काही दिवसांपूर्वी नाल्याच्या उघड्या झाकणांतून दोन मुले पडली होती. त्यांना परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले. शहरातील कणेरी भागातील बिंदू सायझिंगमागे असलेल्या उघड्या गटारात पडून मुलगी मृत झाल्याची घटना यापूर्वी घडली, तर ठाणा रोड, गौरीपाडा भागातील टेलिफोन कार्यालयाजवळ गटारावरील झाकण योग्य रीतीने न बसवल्याने दुचाकी चालवणाऱ्या मुलीचा अपघात होऊन मृत्यू झाला. या सर्व घटना होत असताना बांधकाम विभागातील अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत.
महानगरपालिकेचे ४५ प्रभागांत ९० वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात व प्रभागात झाकण नसलेली गटारे किंवा नाले दिसतील. शहरात कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहत असल्याने झोपडपट्टी व कामगार वस्तीतील गटारांवरील झाकणे चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त आहे. नाले व गटारांवर लोखंडी जाळ्यांची झाकणे लावण्यासाठी मनपा प्रशासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असते. काही परिसरांतील व्यसनी, चरसी व नशेबाज लोक रात्रीच्या अंधारात ही लोखंडी झाकणे काढून भंगाराच्या दुकानांत विकतात. शहरातील भंगाराच्या दुकानांतून अशी झाकणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. ही कारवाई कायम होत नसल्याने येथील भंगाराचा धंदादेखील अशा चोरांकडून चांगला होतो. मनपा बांधकाम विभागातील अधिकारी वारंवार होणाऱ्या या घटनांपासून बोध घेऊन लोखंडी जाळ्यांऐवजी कायमस्वरूपी टिकणाऱ्या सिमेंटच्या अथवा फायबरच्या जाळ्या बसवण्याचा निर्णय घेत नाहीत.

Web Title: Critical veils or death traps of sewers, drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.