राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
By Admin | Updated: March 23, 2015 01:53 IST2015-03-23T01:53:31+5:302015-03-23T01:53:31+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंघावू लागले आहे

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट घोंघावू लागले आहे. येत्या गुरुवारी राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
राज्यात मागील दोन आठवड्यांत अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला होता. अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच पुन्हा राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग जमू लागले आहेत. येत्या गुरुवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यानच्या काळात राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील. रविवारी राज्यात सोलापूर येथे कमाल तापमान चाळीशीच्या जवळ पोहचले. ते ३९.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. सर्वांत कमी तापमानाची नोंद नांदेड येथे १७ अंश सेल्सिअस एवढी झाली. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून विदर्भात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे.