वीज कोसळण्याचे संकट कायम!
By Admin | Updated: July 4, 2014 06:12 IST2014-07-04T06:12:00+5:302014-07-04T06:12:00+5:30
वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये वीजरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला

वीज कोसळण्याचे संकट कायम!
बुलडाणा : वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये वीजरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी पश्चिम वऱ्हाडात ही यंत्रे लावण्याच्या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या भागात वीज कोसळण्याचे संकट कायम असल्याचे चित्र आहे़
मान्सूनपूर्व तसेच परतीच्या पावसाच्या वेळी वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेकडो लोकांचे बळी जातात. शेतात काम करताना वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. यावर उपाय म्हणून वीज कधी व कुठे पडून शकते, याची माहिती मिळावी आणि वीजरोधक यंत्रे बसवावी, यासाठी शासनाने पाऊल उचलले.
राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने ९ मे २००९ रोजी राज्यभरात वीजरोधक टॉवर्स उभारण्याबाबत आदेश पारित केला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दीड लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. यातून नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला तसेच बीड, धुळे, चिपळूण आणि नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा टप्याटप्याने उभारली जात आहे; मात्र नियोजनअभावी यंत्र उभारणीचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून येते. पश्चिम वऱ्हाडाचा विचार केला, तर अकोला जिल्ह्यात ५५ वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र प्रत्येकी केवळ ४ यंत्रे लावण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)