व्यापा-यांवर फौजदारी कारवाई?
By Admin | Updated: March 12, 2015 03:51 IST2015-03-12T03:51:28+5:302015-03-12T03:51:28+5:30
शहरातील व्यापारी वार्षिक विवरणपत्र भरत नसल्याचा परिणाम एलबीटी उत्पन्नावर झाला असून एका वर्षात पालिकेचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे

व्यापा-यांवर फौजदारी कारवाई?
सदानंद नाईक , उल्हासनगर
शहरातील व्यापारी वार्षिक विवरणपत्र भरत नसल्याचा परिणाम एलबीटी उत्पन्नावर झाला असून एका वर्षात पालिकेचे १०० कोटींचे नुकसान झाले आहे. पालिकेने चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी शासनाकडे पाठवून कारवाईची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताच धाडसत्र व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत उपायुक्त जमीर लंगेरवार यांनी दिले आहेत. उल्हासनगर पालिका एलबीटी विभाग वादात सापडला असून विभागाचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. व्यापारी एलबीटीचा भरणा नियमित करीत नसल्याचा फटका शहर विकासकामांना बसला असून गेल्या दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प पडली आहेत. करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी पालिकेने तयार करून कारवाईच्या परवानगीसाठी शासनाकडे पाठविली आहे. तसेच वार्षिक विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
महापालिकेने वार्षिक विवरणपत्र सादर न केलेल्या १२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेने पाठविलेल्या नोटिसा व्यापारी उघडूनही पाहत नसल्याचा प्रकार उघड झाला असून व्यापाऱ्यांवर धाडसत्र व फौजदारी गुन्हे पुढील आठवड्यापासून दाखल करण्याचे संकेत उपायुक्त लंगेरवार यांनी दिले आहेत. एलबीटी विभागात सावळा गोंधळ सुरू असून दबंग स्थानिक राजकीय नेते, व्यापारी, अधिकारी संगनमत करून एलबीटीची लूट करीत असल्याचा आरोप यापूर्वी महासभेत नगरसेवकांनी करून चौकशीची मागणी केली आहे.
शहरातील नोंदणी झालेल्या १५ हजार व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचे करपुनर्निर्धारण करण्याचे आयुक्तांनी ठरविले आहे. मात्र, ९० टक्के व्यापारी वार्षिक विवरणपत्र सादर करीत नसल्याने त्यांच्या व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.