लातूर जिल्ह्यातील औसा शहरात वानवाडा रोड परिसरात स्कोडा कारमध्ये मोठी आग लागल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. मात्र कारची झडती घेतल्यावर पोलिसांना धक्का बसला. या कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला ही घटना अपघात किंवा आत्महत्या वाटली, पण औसा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या घटनेचा छडा लावत, हा पूर्वनियोजित हत्या आणि विम्याचे पैसे लाटण्याचा कट असल्याचे उघड केले.
कारच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी वाहन मालकाची माहिती मिळवली आणि तपासात ही गाडी गणेश चव्हाण वापरत असल्याचे समोर आले. मृतदेहाजवळ सापडलेले ब्रेसलेट आणि इतर वस्तूंच्या आधारे, मृताची ओळख ३५ वर्षीय गणेश चव्हाण अशी करण्यात आली. मात्र, औसा पोलिसांना या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावरील पुराव्यांची सखोल तपासणी केली असता अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. मृतदेह जळालेला असूनही मृतदेहाजवळ सापडलेले ओळख ब्रेसलेट आणि इतर पुरावे खरे दिसत होते, पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पोलिसांना हे स्पष्ट झाले की, हा अपघात किंवा आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या आहे.
तपासादरम्यान, गणेश चव्हाणच्या एका महिला मैत्रिणीची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिचे घर गाठले, तेव्हा प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. गणेश चव्हाणचा मोबाईल फोन गाडीत जळालेला आढळला आणि त्याचे दोन्ही नंबर बंद होते. परंतु, धक्कादायक गोष्ट म्हणजे, गणेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीशी तिसऱ्या मोबाईल नंबरवरून सतत चॅट करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे मृत समजलेला गणेश चव्हाण जिवंत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. औसा पोलिसांनी तत्काळ त्या तिसऱ्या मोबाईल नंबरचे लोकेशन शोधले आणि ते लातूरपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे असल्याचे आढळले.
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पोलीस पथकाने रात्रीच्या वेळी विजयदुर्ग गाठले आणि गणेश चव्हाणला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर, गणेश चव्हाणने संपूर्ण कटाची कबुली दिली. आरोपी गणेश चव्हाणने कबूल केले की, तो कर्जात बुडाला होता. या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी आणि विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्युचा बनाव रचण्याचा भयानक कट आखला. घटनेच्या रात्री त्याने गोविंद यादव नावाच्या एका मद्यधुंद व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर गोविंदला निर्जनस्थळी नेऊन त्याची हत्या केली. आरोपीने गोविंदचा मृतदेह आपल्या गाडीत ठेवला, स्वतःचे ओळखपत्र आणि ब्रेसलेट मृतदेहाजवळ ठेवले आणि नंतर गाडीला आग लावून दिली. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने तो ओळखला जाणार नाही आणि मृतदेह आपलाच आहे, हे सिद्ध होईल, असा त्याचा समज होता. ठोस पुराव्यांच्या आधारे औसा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपी गणेश चव्हाणला अटक केली.
Web Summary : In Ausa, Latur, a man was burned alive in a car. Police investigation revealed it was a planned murder for insurance money. The accused lured a drunk man, killed him, and tried to pass off the body as his own. Police arrested the accused within 24 hours.
Web Summary : लातूर के औसा में एक व्यक्ति को कार में जिंदा जला दिया गया। पुलिस जांच में पता चला कि यह बीमा के पैसे के लिए एक सुनियोजित हत्या थी। आरोपी ने एक शराबी आदमी को फंसाया, उसकी हत्या कर दी, और शव को अपना बताने की कोशिश की। पुलिस ने 24 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया।