Supriya Sule vs Devendra Fadnavis: महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. मुख्यमंत्री म्हणतात की पुण्यात दादागिरी वाढली. या परिस्थितीला जबाबदार कोण? तुम्ही काय कारवाई करताय?, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली.
"सातत्याने राज्यात गुन्हेगारी वाढतेय. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगतेय, मुख्यमंत्री म्हणतात की पुण्यात दादागिरी वाढली. गुंतवणूक येत नाहीये, हेही त्यांनी कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. याच्यामागे कोण आहे? या कंत्राटदारांना कुणाचे पाठबळ मिळते आहे. माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वाटत असेल पुण्यात दादागिरी होतेय, त्यामुळे पुण्यात गुंतवणूक येणार नाही. मग मला मुख्यमंत्र्यांना विचारायाचंय की तुम्ही काय कारवाई केली? याला जबाबदार कोण, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासाकरिता उशिरा का होईना राज्य सरकारच्या वतीने एसआयटीची स्थापना करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमचा पक्ष सातत्याने करत होता. महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांची ज्याप्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्या संदर्भात मागील आठवड्यात मी लोकसभेमध्ये बोलले. मला आशा आहे की एसआयटीच्या मार्फत करण्यात येणारा तपास पारदर्शक व्हावा."
"बिहारमध्ये निवडणूक आयोग जे निर्णय घेतेय, नाव कमी जास्त वाढवली जात आहेत, त्यात पारदर्शकता नाही असे बिहारमधील सगळ्या पक्षाचे लोक म्हणत आहेत. बिहार निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उद्भवले आहेत. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी. कारभार पारदर्शक व्हावा. ही सशक्त लोकशाही आहे. हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही, संविधानाने हा देश चालणार आहे," असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले.