कोट्यातून दोन घरे घेणा-यांवर गुन्हा
By Admin | Updated: September 10, 2014 03:12 IST2014-09-10T03:12:40+5:302014-09-10T03:12:40+5:30
खोटी माहिती सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून दोन घरे घेणाऱ्या २७ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या दोन विभागांनी उच्च न्यायालयात सादर केले

कोट्यातून दोन घरे घेणा-यांवर गुन्हा
मुंबई : खोटी माहिती सादर करून मुख्यमंत्री कोट्यातून दोन घरे घेणाऱ्या २७ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाच्या दोन विभागांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे़ गृहनिर्माण व नगर विकास विभागाने स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती न्यायालयात सादर केली.
गृहनिर्माण विभागाच्या प्रतिज्ञापत्रानुसार यापैकी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़त्यातील ७ जणांनी प्रथम दोन टक्के कोट्यातून व नंतर पाच टक्के कोट्यातून घर घेतले़ तसेच ४ जणांनी प्रथम पाच टक्के कोट्यातून घर घेतले व त्यानंतर दोन टक्के कोट्यातून घर घेतले़ त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ नगर विकास खाताच्या प्रतिज्ञापत्रानुसार, एकूण १६ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ तसेच दोषींचे दुसरे घर ताब्यात घेतले जाणार आहे़ दुसरे घर विकले असल्यास त्याची किंमत बाजारभावाप्रमाणे त्या लाभार्थीकडून वसूल केली जाणार आहे, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे़ याप्रकरणी केतन तिरोडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ खोटी माहिती सादर करून या कोट्यातून दोन घरे घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ यावर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)