सिंचन घोटाळ््याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे
By Admin | Updated: February 24, 2016 00:56 IST2016-02-24T00:56:08+5:302016-02-24T00:56:08+5:30
घोडाझरी कालव्याच्या कामातील गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त) तसेच कंत्राटदारासह सात

सिंचन घोटाळ््याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे
नागपूर : घोडाझरी कालव्याच्या कामातील गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त) तसेच कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
जलसंपदा विभागाचा मुख्य अभियंता (निवृत्त)सोपान, निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश वर्धने , एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सचा संचालक फतेह मोहम्मद अब्दुल खत्री, निसार फतेह खत्री, जैतून फतेह मोहम्मद खत्री, अबिद खत्री आणि जाहिद खत्री यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
विदर्भ पाटबंधारे विभागाअंतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची उघड चौकशी करण्याचे आदेश एसीबीला देण्यात आले होते. त्यानुसार, नागपूर एसीबीच्या विविध अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकल्पाची चौकशी सुरू झाली. पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या ४२.६० ते ८८ किलोमीटरमधील मातीकाम तसेच बांधकामाची चौकशी केली. त्यात निविदा प्रक्रियेपासून ते कोट्यवधींची रक्कम उचलेपर्यंतच्या प्रक्रियेत उघड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडाझरी शाखा कालव्याच्या बांधकामासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास महांमडळाने २००६ मध्ये निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदार कंपन्यांनी सहभाग घेतल्याचे आणि त्यापैकी एफ. ए. कन्स्ट्रक्शन्स कंपनीला कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आल्याचे दाखविले. संबंधित अधिकाऱ्यांनी एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सला काम मिळवून देण्यासाठी श्रद्धा कन्स्ट्रक्शन्स अॅन्ड पॉवर जनरेशन कंपनी प्रा. लि. या कंपनीच्या नावे लेटरपॅड बनवून निविदा प्रक्रियेत कंपनीचा सहभाग दर्शविला. एफ. ए.च्या संचालकांनी बनावट अनुभव प्रमाणपत्रेही सादर केली. (प्रतिनिधी)