अनैतिक संबंधास भाग पाडल्याचा पोलिसांवर गुन्हा
By Admin | Updated: February 14, 2017 03:55 IST2017-02-14T03:55:06+5:302017-02-14T03:55:06+5:30
कोठडी मृत्यू प्रकरणी वडाळा जीआरपीशी संबंधित असलेल्या पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३७७ अंतर्गत...

अनैतिक संबंधास भाग पाडल्याचा पोलिसांवर गुन्हा
मुंबई : कोठडी मृत्यू प्रकरणी वडाळा जीआरपीशी संबंधित असलेल्या पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३७७ अंतर्गत (अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे) व प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल आॅफेन्स अॅक्ट (पॉक्सो)च्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती सोमवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली. मात्र या सर्व आरोपी पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असेही सीबीआयने स्पष्ट केले.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला आरोपी पोलिसांवर आयपीसी कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदवणे शक्य आहे का, अशी विचारणा करत याबाबत विचार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी अंतिम दोषारोपपत्र तयार असून त्यामध्ये आरोपी पोलिसांवर त्यांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांना अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप ठेवला असल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.
‘आरोपींवर हत्येचा आरोप ठेवला जाऊ शकत नाही. कारण तसे पुरावे हाती लागलेले नाहीत. आता अंतिम दोषारोपपत्र तयार असून लवकरच ते दाखल करण्यात येईल,’ असे सीबीआयने न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनंतर हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी ९ मार्च रोजी ठेवली आहे. अॅग्नेलो वालद्रीसचा वडाळा जीआरपीच्या ताब्यात मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलिसांनी केलेल्या छळामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा वालद्रीस यांनी केला आहे. (प्रतिनिधी)