बॉलिवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: February 6, 2015 01:54 IST2015-02-06T01:54:33+5:302015-02-06T01:54:33+5:30
फिर्याद घ्यायला नकार दिल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पुण्यात बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

बॉलिवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा
पुणे : यु ट्युब या व्हिडीओ सर्च इंजीनद्वारे मुंबईत आयोजित ‘एआयबी’ ‘नॉक आऊट रोस्ट आॅफ अर्जुन कपूर अॅण्ड रणबीर कपूर या कार्यक्रमात अश्लील संभाषण झाल्याची फिर्याद घ्यायला नकार दिल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पुण्यात बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कार्यक्रमाचे आयोजक, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर, रणबीर कपूर, अभिनेत्री दिपीका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह तब्बल चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यु ट्युबवरुन हे वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकण्यात आले आहे.
याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी फिर्याद दिली आहे. यु ट्युबद्वारे २० डिसेंबर २०१४ रोजी मुंबईमधील सरदार पटेल सभागृहामध्ये एआयबी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. याचे तीन व्हिडीओ २९ जानेवारी २०१५ रोजी यु ट्युबवर अपलोड करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अर्वाच्च शब्द उच्चारत अश्लील हावभाव केले. त्यामुळे ही बाब सार्वजनिकदृष्ट्या गुन्ह्यास पात्र असल्याने नागरिक या नात्याने शेख यांनी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद उगले यांनी नकार दिला होता.
संबंधित व्हिडीओ लोकमतला मिळाले होते. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याची बातमी गुरुवारी प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळी पोलिसांनी शेख यांची फिर्याद दाखल करुन घेतली. सहभागी कलाकारांसह यु ट्युब, आयोजक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह अबीश मॅथ्यू, आदिती मित्तल, तन्मय भट्ट, सिमरन खंबा, आशिष शक्य, रोहन जोशी, राजीव मसंद, रघू राम, करण जोहर, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दिपीका पदकोण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय होऊ शकते शिक्षा
कलम २९२, २९४ नुसार तीन ते पाच वर्षे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ व ६७ अ नुसार तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असलेले व्हिडीओची सीडी पुरावे म्हणून शेख यांनी सादर केली आहे.