गणेशोत्सवाची वर्गणी उकळणाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Updated: June 9, 2016 04:12 IST2016-06-09T04:12:57+5:302016-06-09T04:12:57+5:30

भार्इंदर पूर्वेच्या फेरीवाल्यांकडून बळजबरीने वर्गणी उकळल्याबद्दल नवघर पोलिसांनी मंडळाच्या दोघा कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime against boiler for bohemians | गणेशोत्सवाची वर्गणी उकळणाऱ्यांवर गुन्हा

गणेशोत्सवाची वर्गणी उकळणाऱ्यांवर गुन्हा

 

मीरा रोड : तीन महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी भार्इंदर पूर्वेच्या फेरीवाल्यांकडून बळजबरीने वर्गणी उकळल्याबद्दल नवघर पोलिसांनी मंडळाच्या दोघा कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
भार्इंदर पूर्वेच्या महात्मा जोतिबा फुले मार्गावर बसणाऱ्या ‘जनवादी हॉकर्स सभा’ या संस्थेचे सदस्य असलेले फेरीवाला मोहम्मद शेख याच्याकडून सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांनी येऊन गणपतीची २१०० रुपये वर्गणी मागितली. त्यावर शेख यांनी खुशीने १०० रुपये देतो, असे सांगताच खवळलेल्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून पूर्ण रक्कम देण्यास फर्मावले. घाबरलेल्या शेख यांनी अखेर त्यांना २१०० रुपये काढून दिले. वर्गणी मिळाल्यावर मंडळाचा नोंदणी क्रमांक नसलेली पावती शेख यांना दिली. जाताजाता मंडळाच्या कृपाशंकर तिवारी या कार्यकर्त्याने तर पुढच्या वेळी ५ हजार रुपये वर्गणी वसूल करणार, असे धमकावले.
या प्रकरणी फेरीवाला संघटनेचे शहराध्यक्ष अ‍ॅड. किशोर सामंत, वीरेंद्र गुप्ता, प्रभाकर शेट्टी आदींनी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना भेटून मंडळाचे कृपाशंकर तिवारी व महेश पुरोहित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नोंदणी क्रमांक नसलेली पावती पाहून पोलिसांनी तिवारी व पुरोहितविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against boiler for bohemians