एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 23, 2017 23:37 IST2017-04-23T23:37:53+5:302017-04-23T23:37:53+5:30
एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.

एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध गुन्हा
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 - तहसील कार्यालयाचे बनावट रजिस्टर तयार करून त्यावर स्वत:च्या जात प्रमाणपत्राच्या नोंदी घेऊन शासनाची आणि तक्रारदाराची दिशाभूल केल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
नगरसेवक जमीर अहेमद कादरी, भाऊ फईम कादरी, भाचा आमेर, मेहुणा जुबेर, राजपूत, दाभाडे आणि दलाल शेख रब्बानी अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. एस. शिनगारे म्हणाले की, जमीर कादरी यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढविताना छप्पर बंद जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी तथा तक्रारदार वाहेद अली झाकेर अली हाश्मी यांनी जमीर कादरी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले तेव्हा तहसील कार्यालयाने न्यायालयात शपथपत्र दाखल करून जमीर कादरी यांचे जात प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेच नसल्याचे नमूद केले होते.
या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून निर्णय घेण्याचे म्हटले होते. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे प्रकरण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केले असता तेथे तहसील कार्यालयाचे दुसरे रजिस्टर सादर करून त्या रजिस्टरमध्ये कादरी यांच्या जात प्रमाणपत्राची नोंद असल्याचे दर्शविले होते. ही बाब आरोपींनी तक्रारदारालाही सांगितली होती. दरम्यान, तक्रारदारांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपी जमीर यांनी स्वत:चे छप्पर बंद जातीचे प्रमाणपत्र काढून आणि खोटे रजिस्टर बनवून त्यात जात प्रमाणपत्राच्या नोंदी घेऊन शासनाची आणि तक्रारदारांची दिशाभूल केल्याचे म्हटले. यासाठी अन्य आरोपींनी तक्रारदाराला मदत केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आदी कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार तपास करीत आहेत.