सी.के.पी बँकेच्या २३ संचालकांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 24, 2016 05:35 IST2016-08-24T05:35:29+5:302016-08-24T05:35:29+5:30
अनियमित व्यवहार करुन ८५ कोटी ४९ लाख ८१ हजार २६ रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सी.के.पी बँकेच्या २३ संचालकांविरुद्ध गुन्हा
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील दि. चांद्रसेनीय कायस्थ प्रभु को. आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालकांनी २०११-१२ या वर्षात अनियमित व्यवहार करुन ८५ कोटी ४९ लाख ८१ हजार २६ रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बँकेच्या अध्यक्षांसह २३ संचालकांवर हा गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या घोटाळ््याविषयी लेख परीक्षण अधिकारी प्रकाश मांढरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या बँकेचे अध्यक्ष विलास गुप्ते यांच्यासह २३ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली. शिवाजी पार्कातील सेनापती बापट मार्गावरील मार्बल आर्ट बिल्ंिडगमध्ये ही बँक आहे.
२०११-१२ या वर्षांचा ताळेबंद नियमित लेखापरीक्षकांना देण्यात आला नाही. या ताळेबंदाची वारंवार मागणी करण्यात आली. तरीही हे ताळेबंद सादर करण्यात आले नाहीत. या वर्षात दिलेली कर्जे, मालमत्ता विक्री करार, नॉन बँकिंग मालमत्ता, विक्रीमध्ये झालेले नुकसान याप्रकारची कोणतीही कागदपत्रे देण्यात आलेली नव्हती. अनेकदा मागणी करुन ताळेबंद सादर न केल्याने लेखा परीक्षण अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर तत्काळ मांढरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित प्रकाराची तक्रार नोंदविली. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)