सहाय्यक आयुक्तासह २१ अभियंत्यांवर गुन्हा
By Admin | Updated: November 20, 2014 03:15 IST2014-11-20T03:15:44+5:302014-11-20T03:15:44+5:30
मुंबई महापालिकेतल्या ई निविदा प्रक्रियेतील कोट्यवधींच्या घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमा

सहाय्यक आयुक्तासह २१ अभियंत्यांवर गुन्हा
मुंबई : मुंबई महापालिकेतल्या ई निविदा प्रक्रियेतील कोट्यवधींच्या घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह २१ अभियंते, एबीएम नॉलेजवेअर कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला.
या घोटाळयाप्रकरणी दाखल झालेल्या खासगी तक्रारीवरील सुनावणीत दंडाधिकारी न्यायालयाने १२ नोव्हेंबरला दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश एसीबीला दिले होते. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच एसीबीने आज संबंधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला. जैन, अभियंते तसेच कंपनीच्या संचालकांनी पालिकेची फसवणूक केली, खोटी कागदपत्रे तयार केली आणि शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुन्हा नोंद झालेल्या पालिका अधिकारी, कंपनी संचालकांच्या निवासस्थानी, कार्यालयांमध्ये एसीबीच्या धाडी पडण्याची दाट शक्यता आहे.
पालिकेच्या निविदा प्रक्रियेतील ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी ई निविदा प्रक्रिया आणली़ मात्र ठेकेदारांनी वॉर्ड स्तरावर अभियंत्यांशी संगनमत करून या प्रक्रियेत शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नगरसेवकांकडून होऊ लागला़ या प्रकरणाच्या चौकशीत २२ अभियंता गुंतले असल्याचे उजेडात आले़ मात्र यामध्ये आर्थिक नुकसान नसल्यामुळे यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असा पावित्रा आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला होता. नगरसेवकांनी याप्रकरणी कोंडीत पकडल्यानंतर २२ जणांची खातेनिहाय चौकशी सुरू केली. दोषींवर कारवाई व्हावी यासाठी भाजपाचे मुंबई सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी खासगी तक्रार करून दाद मागितली होती.