जातपंचायतीच्या २० खंडणीखोरांवर गुन्हा
By Admin | Updated: November 21, 2014 02:00 IST2014-11-21T02:00:44+5:302014-11-21T02:00:44+5:30
न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

जातपंचायतीच्या २० खंडणीखोरांवर गुन्हा
संगमनेर (अहमदनगर) : न्यायालयात निर्दोष सुटका होवूनही परंपरागत निवाड्याच्या नावाखाली एका विधवा महिलेकडून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या ‘जात पंचायत’च्या मुख्य पंचासह २० जणांविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
२२ डिसेंबर २००६ रोजी अहमदनगर येथील वैदू समाजाच्या शांताबाई शिंदे यांचे पती मारूती शिंदे यांचा खून झाला. शांताबार्इंना आपल्या पतीच्या खुनाचा संशय ज्यांच्यावर होता, त्यांनीच शांताबाईसह इतर दोघांविरूध्द फिर्याद दिली. न्यायालयाने खुनाच्या आरोपातून शांताबाईसह दोघांची निर्दोष सुटका केली. मात्र जात पंचायतीने परंपरागत न्याय-निवाडा करण्यासाठी आधी तिघांकडून प्रत्येकी ३० हजार घेतले. पुन्हा काही दिवसांनी प्रत्येकी २ लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल केला. इतकेच नव्हे तर त्यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. शांताबार्इंना पुन्हा जातीत घेण्यासाठी चक्क १५ लाखांची मागणी पंचांनी केली होती. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा अॅड. रंजना गवांदे, जात पंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे व विलास कांगुणे यांच्या मदतीने शांताबार्इंनी जात पंचायतीचे मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी व इतर २० पंचांच्या विरोधात लोणी पोलिसांत तक्रार दिली. तीन दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी, राजा शिंदे, मारूती शिंदे, अंबू शिंदे, बाबू धनगर, मारूती शिंदे, बापू शिंदे, साहेबराव शिंदे, शामराव शिंदे, बापू लोखंडे, हुसेन शिंदे, मल्लू शिंदे, शामलींग शिंदे, नागेश शिंदे, तायगा शिंदे, राजू , अमृत अण्णा पवार, दशरथ शिंदे व खरग्या उर्फ ढवळ्या शंकर शिंदे अशा एकूण २० जणांविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)