देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना
By Admin | Updated: May 28, 2015 00:40 IST2015-05-28T00:40:22+5:302015-05-28T00:40:22+5:30
मंगळयान मोहिमेसारखी आव्हानात्मक मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करुन शास्त्रज्ञांनी देशाचे नाव उंचावले आहे. या मोहिमेतून झालेल्या देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना द्यावे लागेल,

देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना
पुणे : मंगळयान मोहिमेसारखी आव्हानात्मक मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करुन शास्त्रज्ञांनी देशाचे नाव उंचावले आहे. या मोहिमेतून झालेल्या देशाच्या प्रगतीचे श्रेय शास्त्रज्ञांना द्यावे लागेल, असे मत पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ.अरुण निगवेकर यांनी व्यक्त केले.
निनाद, पुणेतर्फे उषा भालचंद्र केसरी स्मरणार्थ १० वा विज्ञाननिष्ठ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार मंगळयान मोहिमेत योगदान देणारे शास्त्रज्ञ नितीन घाटपांडे यांना डॉ.निगवेकर यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. महापालिका उपायुक्त सुनिल केसरी, चंद्रकांत सणस, माजी नगरसेविका शुभदा जोशी, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, मयुरेश जोशी, अनुप जोशी आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सचिन फडतरे, सचिन लहामगे, शुभांगी रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला.
घाटपांडे म्हणाले, सरकारकडून प्रत्येक व्हिजनला महत्त्व दिले जाते. परंतु ते व्हिजन मिशन व्हावे, याकरीता मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून इस्त्रोने पाऊल उचलले. त्यामुळे ही मोहिम यशस्वी होऊ शकली.
उदय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
नितीन घाटपांडे यांनी जबाबदारी पेलली
४डॉ. निगवेकर म्हणाले, ‘‘मंगळयान मोहिमेंतर्गत तेथील माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी, याकरीता यानावर अनेक यंत्रे बसविण्यात आली. परंतु ती कशा प्रकारे चालवायची, हे महत्त्वाचे होते. त्याकरीता सातत्याने उर्जा देणाऱ्या सूर्याच्या शक्तीशिवाय पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी ओळखले आणि सौर उर्जेद्वारे ही यंत्रे कार्यान्वित करण्यात आली. सौर उर्जेची जबाबदारी पुण्याचे नितीन घाटपांडे यांनी यशस्वीपणे पार पाडली याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.